कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कृषी मंत्री अब्दुल सत्तार गमतीनेही बोलतात, त्यांचे किती गंभीर घ्यायचे, अशा शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सत्तार यांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. आमच्याच गटातील नेत्याने आपल्या विरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप सत्तार यांनी केला होता. त्यावर खरे काही माहीत नाही आणि पक्षांतर्गत घडामोडीच्या चर्चा अशा जाहीरपणे करायच्या नसतात, असे सांगत त्यांनी सत्तार यांचे कान टोचले.
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर म्हणाले, बोलण्यापेक्षा निर्णय कृतीत आणून जनतेला दिलासा देणारे हे सरकार आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेला भरभरून दिले आहे; मात्र काहींना टीकाच करायची असते. सीमावासीयांना नवे वर्ष आनंददायी जाईल, असे सांगत त्यांच्यासाठी ज्या ज्या घोषणा सरकारने केल्या आहेत, त्याची अमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्रातील सर्व सुविधा सीमावासीयांना दिल्या जातील.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याकरिता लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे सांगत मुंबईत होणार्या विश्व मराठी संमेलनासाठी जगभरातील मराठी मंडळाचे 498 प्रतिनिधी सहभागी होणार असून देशभरातील मराठी भाषिक प्रदेशातील एक हजार प्रतिनिधी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.