विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतेज पाटील यांच्या पाठीशी एकसंध राहण्याचा निर्धार गुरुवारी जिल्हा परिषद सत्तारूढ आघाडी सदस्यांच्या बैठकीत केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवडणुकीत सतेज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा नेत्यांनी केला.
ना. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करत सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मागील निवडणुकीत अनपेक्षितपणे निवडणूक रिंगणात उतरावे लागले. कोल्हापूरचा भूमिपुत्र म्हणून मातीशी प्रेम असलेल्या स्वाभिमानी मतदारांनी चांगली साथ दिली आणि विधान परिषदेत पाठविले. सत्तेची सर्व सूत्रे उलट्या बाजूला होती, तरीही मतदारांनी कोल्हापूरच्या भूमिपुत्राला साथ दिली. गेल्या सहा वर्षांत दुजाभाव न करता काम केले. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी उमेदवार कोण आहे, ते माहीत नाही. परंतु, विजय निश्चित आहे.
शिवसेना खंबीरपणे पाठीशी
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, सतेज पाटील यांनी आपल्या निवडणुकीची तयारी दोन वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. त्यांच्या गळाला अनेक लोक लागले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि स्वभाव यामुळे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होतात. मंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात प्रचंड काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे. शिवसेना पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.
जिल्हा परिषदेला भरपूर निधी
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षात असतानाही गेल्या वेळी पाटील विजयी झाले होते. आता महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेली शिवसेना सोबत असल्याने किमान 270 मते मिळवून ते विजयी होतील. भाजपची सत्ता असताना जिल्हा परिषदेला वित्त आयोगातून रुपयादेखील मिळाला नव्हता. मात्र, आम्ही त्यांना निधी दिला. त्यांच्या काळात 177 कोटी 1 लाख रुपये निधी मिळाला होता. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कोरोनामुळे खर्चाला मर्यादा असतानाही 524 कोटी 45 लाख रुपये निधी दिला आहे.
भाजपच्या सदस्यांनी या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवावा. केंद्र सरकार आपत्कालीन परिस्थितीत गुजरातला हजार कोटी देते; परंतु महाराष्ट्राला रुपयाची देखील मदत करत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा घडवून आणू, असेही ते म्हणाले.
शिरोळमधील मत बाहेर जाणार नाही
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत कठीण परिस्थिती असतानाही मंत्री पाटील विजयी झाले होते. आता तर सर्वत्र त्यांना पोषक वातावरण असल्याने मताधिक्य जादा मिळेल. शिरोळमधील एकही मत बाहेर जाणार नाही किंवा दुबार होणार नाही.
यावेळची निवडणूक सोपी
आ. पी. एन. पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळची निवडणूक अतिशय सोपी आहे. विरोधकांचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र असल्यामुळे मतामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. पक्षीय राजकारणात आम्ही काँग्रेस सोडून कधीही दुसरा विचार केला नाही. यापुढेही त्यामध्ये फरक पडणार नाही.
'आमचं ठरलंय पार्ट 2' सुरू
खा. संजय मंडलिक म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 'आमचं ठरलंय पार्ट 2' सुरू झाला आहे. खा. धैर्यशील माने यांनी सतेज पाटील यांचा विजय निश्चित असल्याने तटस्थ असणार्यांनी आताच महविकास आघाडीसोबत यावे, असे सांगितले.
पूरग्रस्तांना मदत करा
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा देत त्यांनी व मंत्री मुश्रीफ यांनी पूरग्रस्तांना मदत करावी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आ. उल्हास पाटील, राजीव आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, गोपाळराव पाटील, 'गोकुळ'चे चेअरमन विश्वास पाटील, डॉ. संजय डी. पाटील, ए. वाय. पाटील, संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, 'दत्त शिरोळ'चे चेअरमन गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, 'गोकुळ'चे माजी संचालक अनिल यादव, दिलीप पाटील, इचलकरंजी नगरसेवक शशांक बावचकर, मदन कारंडे, रवींद्र माने, राहुल खंजिरे, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयराम पाटील, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर, बाबासो पाटील-आसुर्लेकर, भैया माने, युवराज पाटील, सतीश पाटील, अंबरिष घाटगे, बाळासाहेब खाडे, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी आभार मानले.
मतदारांच्या इच्छा पूर्ण करणारा 'सांताक्लॉज'
खा. मंडलिक यांनी मंत्री पाटील यांचा 'सांताक्लॉज' असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देत मंत्री सामंत म्हणाले, 'सांताक्लॉज' म्हणजे सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा. त्यामुळे पाटील मतदारांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील.
तुम्ही सहलीवर निघा म्हणजे आम्ही निवांत
कोरोनामध्ये रुग्णांची सेवा आणि आतापर्यंत सामाजिक कामे करून कंटाळला असाल. त्यामुळे श्रमपरिहारासाठी मतदारांनी लवकर बॅगा भरून सहलीला निघावे. आम्ही तुमची सर्व सोय करू. तुम्ही सहलीला गेल्याशिवाय आम्ही निवांत बसू शकत नाही, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
मी तुमचा हनुमान!
मंत्री यड्रावकर भाषण करत असताना वक्त्यांनी माध्यम प्रतिनिधींची नावे न घेतल्याचा उल्लेख केला. यावर मंत्री मुश्रीफ त्यांना काही तरी बोलले तेव्हा मंत्री यड्रावकर म्हणाले, मी तर तुमचा हनुमान आहे.