आपल्या आई, पत्नीसह चार दिवसापासून मुक्कामी असलेल्या सचिन तेंडुलकरने 'मी पुन्हा येईन…म्हणत' ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आपला मुक्काम आज मंगळवारी हलविला. यंदाच्या दौऱ्यात त्याला फक्त शेवटच्या दिवशी व्याघ्र दर्शन झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांना वाघांचे दर्शन न झाल्याने त्यांनी पुन्हा येणार असल्याचे सांगितले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या आई व पत्नी डॉक्टर अंजलीसह शनिवारी (4 सप्टेंबर 2021) ला दुपारच्या सुमारास ताडोबात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत काही मित्रांचा समावेश होता. 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत चार दिवस ताडोबातील बांबू रिसोर्टवर मुक्कामी ठोकून त्यांनी व्याघ्र पर्यटन केले.
सचिनचे ताडोबात शनिवारी दूपारी आगमन झाल्यानंतर चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्ट येथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेत मदनापूर गेट वरून ताडोबा सफारी केली परंतु पहिल्या दिवशी त्यांना वाघांचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे रविवारी सचिन तेंडुलकरने आपला मार्ग बदलवून सकाळी 7 वाजताच्या वसुमारास अलिझंजा गेट वरून सफारी केली होती. येथेही वाघाचे दर्शन झाले नाही.
त्यामुळं सचिन तेंडुलकर ने पुन्हा आपला सफारीचा मार्ग बद्दलवून रविवारी सायंकाळी शिवणी जवळील शिरकडा गेट वरून ताडोबातील बफर झोन क्षेत्रात सफारी केली. या गेट वरून वाघाचे दर्शन दुर्मिळच होत असते त्यामुळे येथेही निराशा झाली. वाघ पाहायला मिळाला नाही. त्यानंतर सोमवारी सचिनला भूरळ घालणारी वाघीण "झुनाबाई"साठी मदनापूर गेट वरून सकाळी व सायंकाळी ताडोबाच्या बफर क्षेत्रात कुटुंबियासोबत सफारी केली.
मात्र सकाळी व सायंकाळी झालेल्या सफारीत त्यांना वाघाला पहाता आले नाही. पहिल्यांदा तीन दिवसाच्या जंगलसफारीत वाघाच्या दर्शनाचा न पाहण्याचा दुर्मिळ योग यावेळी सचिनच्या वाट्याला आला.
आज मंगळवारी अखेरच्या दिवशी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मदनापूर गेट मधून बफर झोन परिक्षेत्रात सफारी करण्यात आली. तेव्हा 'छोटी राणी' व 'पाटलीन बाई' चे 2 बछडे सचिनला पहाता आले. त्यानंतर दुपारी चार वाजताचे सुमारास त्यांनी या ठिकाणावरून आपला मुक्काम हलविला.
ताडोबातून वाहनाने ते नागपूरला पोहचले आणि तेथून ते मुंबईला रवाना झाले. मात्र यावेळी त्यांना अपेक्षेप्रमाणे वाघांचे दर्शन न झाल्याने 'मी पुन्हा येईन…' म्हणत ताडोबातील सचिन यांनी कर्मचा-यांचा निरोप घेऊन व्याघ्र पर्यटनाचा दौरा आटोपला.
भारतीय टीम ने टेस्ट जिंकली याबाबद्द आपण काय सांगाल असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी, भरपूर आनंद आहे. भारत जिंकतो तेव्हा खूप आनंद होतो, अशी प्रतिक्रिया दिली. सोबतच चिमूरची जनता खूप चांगली आहे. खूप सहकार्य करतात असे पत्रकारांशी मराठमोळ्या भाषेत संवाद करतांना सांगितले. यावेळी चिमूर तालुका प्रेस अशोसीएशन अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, राजकुमार चुनारकर, प्रमोद राऊत, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण इत्यादी उपस्थित होते.
नागपूर येथील क्रितीका धनंजय सिंग ही मुलगी बॅट घेऊन मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांना भेटायला ताडोबात आली होती. 15 वर्षीय क्रितीकाला सचिनने बॅट वर ऑटोग्राफ दिला. तसेच तिच्या बाबत विचारपूस केली.