Latest

संशोधन : मानवी अस्तित्वाला आव्हान देणारं ‘झुनॉसिस’

Arun Patil

विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग माणसांपर्यंत येण्याचं कारण असलेले प्राणी कसे दूर राहतील, याची काळजी घ्यायला हवी.

कोरोनासारख्या आजाराचं मूळ हे झुनॉसिसमध्ये आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. त्यामुळेच 'झुनॉसिस' ही संकल्पना भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्थेचा बोजवारा वाजवत गेली चार वर्षं पृथ्वीवर धिंगाणा घातला. त्यामुळे कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी कोरोनासारख्या आजारांच्या मुळाशी असलेल्या झुनॉसिसचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. भारतासह जगभरातल्या अनेक देशांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. जेव्हा एखादा विषाणू त्याच्यापासून संक्रमित होणार्‍या इतर सजीवांनंतर, मानवाला संक्रमित करू लागतो तेव्हा या प्रक्रियेला 'झुनॉसिस' असं म्हणतात. कोरोनाच्या आधीही या प्रकारचे झुनॉसिसमुळे घडणारे आजार येऊन गेले आहेत आणि यापुढेही ते पूर्णपणे टाळता येतील, अशी चिन्हे नाहीत. माणसाकडून निसर्गात होत असलेल्या भयंकर हस्तक्षेपामुळे प्राण्यांचा माणसाशी होणारा संघर्ष वाढलाय. त्यामुळेही झुनॉसिसचा धोका बळावतोय.

साधारणतः शहरीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग येण्यापूर्वी माणसाचं आयुष्य विशिष्ट प्रदेशापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे रोगांचं संक्रमणही मर्यादित आणि नियंत्रण करायला सोपं होतं. आज चीनच्या कोपर्‍यात झालेला आजार, दुसर्‍या टप्प्यात बीजिंगमध्ये आणि तिथून तिसर्‍या टप्प्यात जगभरातल्या विविध देशांमध्ये आणि चौथ्या टप्प्यात अ‍ॅमेझॉनच्या जंगलापर्यंत पोहोचू लागलाय. जागतिकीकरणामध्ये ज्या वेगात माणसं फिरतायत, त्यामुळे हे संक्रमण आज अनियंत्रित होत चाललंय.

आहाराच्या बदलत चाललेल्या सवयी, हेही झुनॉसिसचं महत्त्वाचं कारण आहे. मांसाहार हा माणसाचा आदिम अवस्थेपासूनचा आहार आहे. त्यामुळे मांसाहाराबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण आज स्वतः शिकार करून कुणी खात नाही. तसंच आपण काय खातोय, ते किती स्वच्छ आहे, किती दिवस फ्रिजमध्ये ठेवलंय याचं काहीच भान न बाळगता फक्त चवीकरता मांस खाल्लं जातंय. या सगळ्यामुळेही त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या घरात असलेली गुरे आणि पाळीव प्राण्यांशी झालेल्या जवळीकमुळे किंवा पक्ष्यांपासून होणारा ताप म्हणजेच एवियन इन्फ्लुएन्झा आणि गुरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यापासून पसरणार्‍या तापाचा म्हणजेच अँथ—ॅक्ससारखे रोग या आधी अनेकदा झाले आहेत. उदाहरणार्थ प्राण्यांच्या आतड्यात विषाणूची बाधा झाली असेल, तर त्यांच्या मांसामुळे टायफाईड किंवा पॅराटायफाईडसारखे आजार होतात. तसंच कीटकांपासूनही झुनॉटिक्ससारख्या संक्रमणाची प्रक्रिया होणं हीही एक सामान्य गोष्ट आहे.

एचआयव्ही आणि इबोला यांचा झालेला मानवी संसर्ग हाही झूनॉसिस या प्रक्रियेतूनच झालाय. या दोन्ही संसर्गाला कारण ठरलेले विषाणू हे आफ्रिकेतल्या चिंपांझी आणि वटवाघळांसारख्या वन्य प्राण्यांपासून तिथल्या माणसांपर्यंत पोचले, असं संशोधनातून स्पष्ट झालंय. आफ्रिकेच्या जंगलामधल्या वन्य जीवांचं मांस माणसांच्या खाण्यासाठी वापरलं जातं. त्याला 'बुश मांस' असं म्हटलं जातं. त्याच्याशी या साथींचा संबंध जोडण्यात येतो.

बुश मांसासाठी होणारी कत्तल आणि त्याचा व्यापार हा जैवविविधतेसाठी धोका असल्याचा विचार 2005 नंतर अधिक दृढ होऊ लागला. एकीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे वनक्षेत्र घटत गेलं. तर दुसरीकडे वाढत्या मानवी वस्तीमुळे मांसाची मागणी वाढत गेली. यामुळे जंगलातली शिकार करणं हा मोठा धंदा बनला. त्यातूनच रोगजंतूचा संसर्ग झालेल्या प्राण्यांशी संपर्क होण्याची शक्यता आणि त्यातून नव्या विषाणूंचं इतर प्रजातींमधे संक्रमण होण्याची शक्यता वाढली.

1980पासून झुनॉसिसचं प्रमाण कसं वाढलं, याबद्दलचं आपलं संशोधन कॅथरीन स्मिथ यांनी 2014 मध्ये रॉयल सोसायटीमध्ये प्रकाशित केलं. झुनॉसिस म्हणजे 'जागतिक आरोग्यासामोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे' असं या संशोधनाचं म्हणणं आहे. जेव्हा जंगलांच्या क्षेत्रात माणसांचा वावर वाढतो आणि नैसर्गिक परिसंस्थेत हस्तक्षेप केला जातो, तेव्हा प्राण्यांच्या वर्तनातही बदल होतात. त्या प्राण्यांचा मानवासह इतर पाळीव प्राण्यांशी संपर्कही वाढू लागतो. त्यातूनच एखाद्या विषाणूचा एका प्रजातीतून दुसर्‍या प्रजातीत संसर्ग होण्याचा धोकाही वाढत असतो. ही विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जंगलांमध्ये होणारा माणसाचा हस्तक्षेप लवकरात लवकर रोखणं आत्यंतिक गरजेचं आहे.

माणसाला आतापर्यंत सुमारे पाच हजार विषाणू ज्ञात आहेत. त्या प्रत्येकापासून उद्भवणारे काही ना काही आजार आहेतच. सर्वच विषाणू जीवघेणे आहेत असं नाही. मात्र कित्येक विषाणूंनी पसरवलेल्या आजारांनी थेट मृत्यूचं तांडव मांडलं. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग माणसांपर्यंत येण्याचं कारण असलेले प्राणी कसे दूर राहतील, याची काळजी घ्यायला हवी.

प्राण्यांपासून दूर राहणं म्हणजे मांसाहार नाकारणं असं नाही. मांसाहार हा खाण्याच्या सवयींशी, आर्थिक संरचनेशी जोडलेली गोष्ट आहे. त्यामुळे झुनॉसिसचं कारण सांगून मांसाहारावर बंदी आणण्यासारखं नियोजन म्हणजे आगीतून फुफाट्यात जाणं ठरेल. त्यामुळेच मांसाहारातल्या स्वच्छतेविषयी किंवा विक्रीच्या नियमनाविषयी जागृती वाढवणं ही पहिली पायरी ठरेल. मांसविक्रीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ही तत्त्वे समजून घेऊन स्थानिक यंत्रणेनं ती राबवली पाहिजेत.

यासोबतच मोठ्या प्रमाणात जंगलं वाचवून प्राण्यांचे अधिवास टिकवायला हवेत. कारण जंगलात मिळणार्‍या फळांवर जगणार्‍या वटवाघळांना, त्यांच्या मूळ अधिवासाची जागा उद्ध्वस्त झाल्यानं मानवी वस्तीत शिरावं लागलं. मानवी वस्तीतल्या फळझाडांकडे वळावं लागल्यानं त्यांचा इतर पाळीव प्राण्यांशी संपर्क आणि जवळीकही वाढली. त्यामुळेच निपाह आणि हेंड्रा यांसारख्या विषाणूंचा एका प्रजातीतून दुसर्‍या प्रजातीत होणारा संसर्गही वाढला, हे विसरून चालणार नाही.

निसर्गातले आपणही एक प्राणी आहोत, याचं भान माणसानं बाळगणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज हेच भान गमावल्यानं माणून निसर्गाचं अपरिमित नुकसान करतोय. त्यामुळे माणूस आणि प्राणी यांच्यातला संघर्ष वेगवेगळ्या स्तरावर पाहायला मिळतोय. हा संघर्ष जर टोकाला पोचला तर तो माणसाच्या अस्तित्त्वाचा शेवटही करू शकतो, याची जाणीव माणसानं ठेवायला हवी.

आज कोकणातल्या अनेक गावांमध्ये माकडांचा वावर प्रचंड वाढलाय. फळझाडांचं प्रचंड नुकसान होतंय. मुंबईसारख्या शहरात बिबट्या मानवी वस्तीत येऊ लागलाय. सिंधुदुर्गात हत्ती शेतीची नासधूस करतायत. महाराष्ट्रातली ही उदाहरणं मराठी वाचकाला जवळची वाटतील म्हणून दिली. पण देशभरचं नाही तर जगभर हीच परिस्थिती आहे. हे प्राणी जेव्हा मानवी वस्तीत येतात तेव्हा ते आजार घेऊन येतात, हे विसरून चालणार नाही.

मानवानं पर्यावरणावर घाला घातला की निसर्गही मानवाकडून त्याचं देणं व्याजासकट परत घेतो, हे आजवर महापूर, कोसळणार्‍या दरडी आणि दुष्काळामधून आपण पाहिलंच आहे. पण आता झुनॉसिसच्या स्वरूपात तो सूक्ष्म रूपानंही आपल्याला संपवू शकतो, याची चुणूक इबोला, अँथ—ेक्स, स्वाईन फ्लू आणि आता कोरोनानं दिलीय. यातून जेवढ्या लवकर आपण शिकू तेवढीच आपली वाचण्याची शक्यता वाढेल.

नीलेश बने 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT