Latest

संशोधन : चंद्रावरील माती करू शकते ऑक्सिजन, ऊर्जेची निर्मिती

मोनिका क्षीरसागर

बीजिंग : चंद्रावर मानवाला राहण्यायोग्य परिस्थिती निर्माण करण्यासंदर्भात सध्या कसून संशोधन सुरू आहे. चंद्रावर मानवाला दीर्घकाळ राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा कशा पुरवता येतील? यावर हे संशोधन सुरू आहे. यामध्ये पाणी, हवा, राहण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या निर्मितीचे तंत्र इत्यादींचा समावेश आहे.

यासंदभार्र्त करण्यात आलेल्या संशोधनात चिनी शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या मातीत असा एक सक्रिय पदार्थ आहे की, तो कार्बन डाय ऑक्साईडला ऑक्सिजन आणि इंधनात बदलू शकतो. गेल्या वर्षी चीनचे मानवरहित चिनी यान चंद्रावर गेले होते. या मोहिमेच्या माध्यमातून तेथून चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात आले. या नमन्यांचा अभ्यास करून चिनी संशोधकांनी वरील निष्कर्ष काढला.

चंद्रासंबंधी चिनी शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन 'जूल' नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. चंद्रावर उपलब्ध संसाधनापासून मानवाला राहण्यायोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात का? यासंबंधीचे हे संशोधन आहे. 'नानजिंग युनिव्हर्सिटी'तील यिंगफांग याओ आणि जिगांग झोऊ हे शास्त्रज्ञ असे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यामुळे चंद्रावरील माती आणि सौरविकिरणांचा लाभ उठवला जाऊ शकेल. खरे तर चंद्रावर माती आणि सौर ऊर्जा हे दोन सहजरीत्या मिळणारी साधने आहेत. तेथील माती लोहाने व टाईटेनियमने समृद्ध आहे. या पदार्थांत उत्प्रेरक म्हणून काम करण्याची क्षमता आहे. त्यापासून ऑक्सिजन व इंधन विकसित करणे शक्य बनू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT