एव्हरेस्ट वीर पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस दि.26 जुलैरोजी सर करून नवा इतिहास घडविला. ते सांगली जिल्ह्यातील, वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे आहेत. नवी मुंबई पोलिसांत काम करतात.
ते म्हणाले, जगातील सात सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याची माझी मनीषा आहे. त्यापैकी एव्हरेस्टनंतर युरोप खंडातील हे दुसरे शिखर मी सर केले आहे. दि. 26 जुलैरोजी पहाटे 3 वाजता समीटपूशसाठी सुरवात केली. पाच तासांच्या चढाईनंतर आम्ही या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो. माझी प्रत्येक मोहीम ही एक ब्रीदवाक्य घेऊन मी यशस्वी करतो. यावेळी 'बेटी बचावो, बेटी पढाओ', हा फ्लॅग घेऊन एक 12 वर्षांची मुलगी सोबत होती.
आज माझ्या गावातील दीपाली खोत, वैशाली कोकाटे, पल्लवी कोकाटे, शीला खोत, मनीषा कदम या अधिकारी बनल्या आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो. म्हणून माझी ही मोहीम त्या लेकींना मी समर्पित करीत आहे. कारण त्यांनी गावाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव मोठ केले आहे. माउंट एलब्रूस हा युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत आहे.
या शिखरांची उंची 5 हजार 642 मीटर (18510 फूट) आहे. काळा समुद्र आणि कॅरेबियन समुद्र यांच्या मध्यभागी ते आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला आहे. तिथे रात्रीचे तपमान उणे 25 ते उणे 40 अंश सेल्सिअस असते. नेहमी बदलते वातावरण, बर्फवृष्टी अशा अनेक समस्यांतून मार्ग काढावा लागतो.गुरव म्हणाले, या शिखरावर पोलिसदलाचा फलक फडकवून 'भारत माता की जय', अशी घोषणा देताना उर भरून आला. आता लवकरच पुढील मोहिमेवर निघणार आहे.