मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)चे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मागणीला बुधवारी जाहीरपणे विरोध केला. देशात भाजपसमोर काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे यूपीए अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपुआ अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडीत बेबनावाची स्थिती निर्माण झाली आहे.
2024 मध्ये होणार्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा आणखी एक प्रयत्न पं.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरु आहे. यासाठीच युपीएचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे सोपविण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेनेने अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात योग्य नेते असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने या पूर्वीही शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र नाना पटोले यांनी त्यांच्या या प्रस्तावाला विरोध करत काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहील असे सांगतले.
भाजपच्या विरोधात देशाचा काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. दुसरा असा कोणताही पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. संपुआ अध्यक्षपदाबाबतचा निर्णय हा संपुआच्या घटक पक्षाच्या बैठकीतच होईल, असेही पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेने शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, हा सर्वांनी एकत्र मिळून घेण्याचा निर्णय आहे. संपुआचे अध्यक्षपद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. नेतृत्वात काही बदल करायचा झाला तर युपीएच्या बैठकीतच त्यावर निर्णय ोहऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र शरद पवार हे अनुभवी आणि सक्षम नेते आहेत, त्यांना संपुआ अध्यक्ष केल्यास फायदा होईल, असे सांगितले.
भाजपच जिंकेल : चंद्रकांत पाटील
दरम्यान, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य कोणाला द्यावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपच जिंकेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांचा विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या 25 आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत. या सगळ्यात जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत, असेही पाटील यांनी सांगतले.
सेनेचे 90 % आमदार नाराज : बावनकुळे
विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज असल्याचा दावा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत 100 जागा निवडून येतील असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच राष्ट्रवादीला फायद्याची ठरणार असल्याचा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला.