Latest

शेअरबाजार : बाजाराचा अश्वमेध पुन्हा धावू लागला

Arun Patil

गेल्या आठवड्यात गुंतवणुकीत ज्यांचे समभाग आहेत आणि ज्यांचे समभाग गुंतवणुकीत नाहीत, त्यांनीही ख्रिसमस पार्ट्या उत्तमरितीने साजर्‍या केल्या असतील. फक्त शेअरबाजार च त्याला अपवाद होता. तिथे पडझडच चालू होती. पण त्यानंतर बाजाराचा अश्वमेध परत धावू लागला आहे. अजून 10,12 दिवसांनी आर्थिक 2021 या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीचे (डिसेंबर 2021) आकडे येऊ लागतील. मात्र ते फारसे उत्साहजनक असणार नाहीत. कारण कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्यातच नवीन ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा धसका सुरू झाला आहे.

गुरुवारी 23 डिसेंबरला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 57,315 वर होता; तर निफ्टी 17,072 वर होता. पण शुक्रवारी शेअरबाजार बंद होताना घसरण झाली. काही प्रमुख शेअर्सचे भाव गुरुवारी 23 डिसेंबरला पुढीलप्रमाणे होते.

हेग लिमिटेड 1608 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 321 रुपये, मन्नापुरम फायनान्स 166 रुपये, बजाज फायनान्स 6917 रुपये, जे. कुमार इन्फ्रा 165 रुपये, रेप्को होम्स 263 रुपये, जिंदाल स्टील 385 रुपये, मुथुट फायनान्स 1494 रुपये, के.इ.आय इंडस्ट्रीज 1126 रुपये, लार्सेन अँड ट्रबो 1877 रुपये, लार्सेन अँड ट्रब्रो इन्फोटेक 7033 रुपये, भारत पेट्रोलियम 377 रुपये, ग्राफाइट 409 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 461 रुपये, स्टील स्ट्रीप्स 823 रु. पी.एन.बी. हाऊसिंग 509 रुपये, भारती एअरटेल 678 रुपये, बजाज फिनसर्व्ह 16,169 रुपये, एच.डी.एफ.सी. 2571 रुपये, नवीन फ्युओर 4006 रुपये.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 10 टक्क्यांहून अधिक आणि एकूण रोजगारातील 8 टक्क्यांहून अधिक हिस्सा असणार्‍या किरकोळ क्षेत्रातील विक्री गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनापूर्व पातळीपेक्षा अधिक झाली आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये किरकोळ विक्री नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत सहा टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. सहा टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

तर नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत ही विक्री 16 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काही वर्षांपूर्वी जाचक वाटणारा टोल महसूल आता लोकांच्या अंगवळणी पडला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल महसूल पुढील तीन वर्षांत सतत वाढतच राहील. सध्या हा महसूल वर्षाला 40 हजार कोटी रुपये आहे. तो दरवर्षी 1.40 लाख कोटी रुपयांवर जावा. याचे कारण देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. जगातील पहिल्या 6 राष्ट्रांतील अर्थव्यवस्थेत आता भारताची अर्थव्यवस्थाही गणली जात आहे.

'अ‍ॅपल'ने देशातील प्रकल्पांमध्ये 'आयफोन13'चे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. चेन्नईतील 'फॉक्सकॉन'च्या प्रकल्पात याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सेमीकंडक्टरचा प्रश्न निकाली काढण्यात 'अ‍ॅपल'ला यश आल्याने 'आयफोन'चे उत्पादन पुन्हा मूळ पदावर आले आहे. चिपच्या कमतरतेमुळे जगातील अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. देशात उत्पादित होणार्‍या 'आयफोन 13' पैकी जवळपास 20 ते 30 टक्के उत्पादने निर्यात केली जातात.

देशांतर्गत बाजारात उत्पादन वाढल्यास जागतिक बाजारात त्याचा पुरवठा करणे सोपे होईल, अशी कंपनीची इच्छा आहे. 'आयफोन 13 प्रो' आणि 'आयफो13 प्रो मॅक्स'यांची देशांतर्गत मागणी वाढत आहे. त्यामुळेच 'अ‍ॅपल'ने 'आयफोन13'च्या मालिकेचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत करण्याचा निर्णय घेतला. एका अहवालाच्या माहितीनुसार जवळजवळ 70 टक्के भारतीय ग्राहक 'मेड इन इंडिया', 'आयफोन'चाच वापर करत आहेत.

सन 2021 च्या डिसेंबरअखेर देशांतील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. एकूण 63 कंपन्यांनी यावर्षी प्राथमिक भाग विक्रीच्या माध्यामातून 1 लाख 18 हजार 704 कोटी रुपये भांडवलाची उभारणी केली. हाही विक्रम 2022 च्या कॅलेंडर वर्षात मोडला जावा कारण भारतीय आर्युविमा मंडळाच्या येऊ घातलेल्या आयपीओची पहिल्या सहामाहीत विक्री होणार आहे.

2020 मध्ये झालेल्या भांडवल उभारणीपेक्षा यंदाची भांडवल उभारणी साडेचार पट अधिक आहे. 'पेटीएम'चा आयपीओ यंदाचा सर्वांत मोठा आयपीओ होता. 'पेटीएम'ने 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात यशस्वीरित्या खपवला. त्याच्यानंतर 'झोमॅटो'ने 9,300 कोटी रुपयांचे समभाग विक्रीला काढले होते. 2022 या वर्षात जगातील भांडवली बाजारात उल्लेखनीय भांडवली बाजार ठरेल.

राष्ट्रीयकृत बँकांतील थकीत कर्जे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वंकष पावले उचलली होती. त्यासाठी 'वन टाईम सेंटलमेंट'चा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. बँकांनी गेल्या 7 वर्षांत 5.49 लाख कोटी रुपयांची अनार्जित कर्जांची वसुली केली.

डॉ. वसंत पटवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT