गेल्या आठवड्यात गुरुवारी 10 मार्चला शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 55464 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 16594 अंकांवर स्थिरावला.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचे सावट दूर झाले नसताना हे दोन्ही निर्देशांक उसळले. केंद्र सरकारला आपले जवळजवळ 21 हजार लोक परत आणण्यात यश मिळाले. त्याचाच कदाचित हा परिणाम असावा. केंद्र सरकारवर लोकांचा द़ृढ विश्वास आहे. हे त्याचे प्रमुख कारण असावे. ऊर्जा, विज्ञापन तंत्रज्ञान आणि बँका व वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळेही दोन्ही निर्देशांक उसळले.
निर्देशांकाच्या 30 कंपन्यांपैकी एशियन पेंटस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र, इंड सिंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या समभागांना जास्त पसंती होती.
विदेशी गुंतवणूकदारांनी मात्र चढत्या भावांचा विक्रीसाठी उपयोग करून घेतला. समभागांमध्ये गुंतवणूक करणारे भांडवली गुंतवणूकदारांनी नफा गाठीला बांधून 7.21 लाख कोटी रुपये कमावले. यापूर्वी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात युक्रेन-रशिया युद्धाचे सावट असल्यामुळे सतत शेअर बाजार पडत होता.
मात्र बुधवारी 9 मार्चला रशिया-युक्रेन युद्ध संपेल अशी चिन्हे दिसल्यामुळे निवेशक आश्वस्त झाले. त्यामुळे ही विमान कंपन्यांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा 23 मार्च 2020 पासून 2 वर्षे बंद होती. ती येत्या 27 मार्चपासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे समभाग वधारले. इंटरग्लोब एव्हीएशनचा समभाग 7 टक्के वधारला. तो 1711 रुपयांवर बंद झाला. स्पाईसजेटचा समभाग 6 टक्क्याने वर जाऊन 60 रुपयांच्या आसपास स्थिरावला.
रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे ठरेल म्हणून नामांकित कंपन्यांनी रशियातून आपली पावले आखडण्यास सुरुवात केली आहे. अॅपल, एचएसबीसी, मॅकडोनल्डस ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था डळमळण्याबरोबरच तिथे बेरोजगारीही वाढेल. त्यातून 1929 सालासारखी जागतिक आर्थिक मंदी तर येणार नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे. व्हिसा व मास्टरकार्ड यांनी रशियातील आपले व्यवहार कमी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन एक्स्प्रेस ही कंपनीही त्यांचेच अनुकरण करील.
जनरल मोटर्स, फोर्ड मोटार, फोक्सवॅगन व टोयोटा या कंपन्यांनीही रशियाकडे गाड्यांची निर्यात करणे आखडले आहे. व्होल्व्हो व डेमलर या अवजड वाहनांची निर्मिती करणार्या कंपन्यांनीही आपले पाय आखडते घेतले आहेत.
जीन्स तयार करणार्या लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीने पण आपले व्यवहार आखडते घेतले आहेत. सॅमसंग या कंपनीने युद्धाच्या निषेधार्थ रशियातील आपल्या 30 टक्के बाजारहिश्यावर पाणी सोडले आहे. मायक्रोसॉफ्टनेही रशियाला यापुढे कोणतीही नवी सेवा व उत्पादने विकली जाणार नाहीत, असे जाहीर केले आहे.
अॅपलनेपण आयफोनची विक्री थांबवली आहे. रशियाला संगणकांचा सर्वाधिक पुरवठा करणार्या एचपी इन्कॉर्पोरेशनने तसेच इंटेलने आपल्या उत्पादनांची निर्यात लक्षणीय प्रमाणात कमी केली आहे. 'छखघश' या लोकप्रिय पादत्राणे निर्माण करणार्या कंपनीने मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगून मालाची विक्री आखडती घेतली आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्राथमिक भाग विक्रीसाठी सेबीने (डएइख) मंजुरी दिली. त्यासाठी आवश्यक असलेले 'रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस' एलआयसीने सादर केले. त्यामुळे केंद्र सरकारला 'एलआयसी'च्या प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) सुमारे 63 हजार कोटी रुपयांची उभारणी करता येईल. 1955 साली सर चिंतामणराव देशमुख यांनी देशातील सर्व खासगी विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीयीकरण केले. त्यांच्या दूरद़ृष्टीची यावरून कल्पना येईल.
2021 ते 2022 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
1) कोरोना काळात केलेल्या प्रभावी उपाययोजना, 2) टप्प्याटप्प्याने हटवलेले निर्बंध, 3) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी.
मागील 2020 ते 2021 या आर्थिक वर्षांत 8 टक्के दराने विकासदरात घट झालेली भरून काढून 2021 ते 2022 या आर्थिक वर्षांत विकासदरात 12 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिली आहे. या वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे दिसते. ही बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे.
डॉ. वसंत पटवर्धन