डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारल्याच्या घटनेला आठवडा उलटला आहे. शिवसेना नेतृत्वाने या बंडखोर आमदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचे चित्र आहे.
एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरामध्ये शिवसेनेत कालपर्यंत कमालीची शांतता दिसत होती. मात्र सोमवारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत डोंबिवली शहर शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढल्याने वातावरण अचानक तापले. शहर शाखेत शिवसैनिक व शिंदे समर्थक आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तथापि तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला.
एकनाथ शिंदे यांनी 20 जून रोजी तब्बल 40 आमदारांसह बंड केल्याने ते शिवसेनेच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे असे बंड ठरले आहे. तरीही ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आठवडाभर शांत होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यातच बंडखोर गटाने अजूनही आपण शिवसेना सोडली नसल्याची व शिवसेनेतच असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. तसेच आजही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरले नाहीत. दुसरीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे गटनेते पद काढले असले तरी त्यांचे शिवसेना नेतेपद काढून घेतले नाही. त्यामुळे आजही सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे.
डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही कार्यालय आहे. सोमवारी सकाळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. त्यांनी शाखेत लावलेले एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून बाजूला ठेवले. याची खबर मिळताच शिंदे समर्थक शिवसेना शाखेत पोहोचले व त्यांनी जाब विचारला. यावरून शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांत तू तू-मै मै तर झालीच, शिवाय एकमेकांना शिव्या हासडण्यासह धक्काबुक्की देखील केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव तूर्त निवळला. शिंदे समर्थकांना तात्काळ शाखेतून बाहेर काढा, असा तगादा शिवसैनिकांनी लावल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर वातावरण शांत झाले.
रणरागिणींचा मध्यवर्ती शाखेबाहेर पहारा
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आणि कायम राहणार, अशी ठाम भूमिका शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांना फोन करत होते. मात्र खासदार डॉ. शिंदे यांचे फोन आम्ही उचलले नाही, असे कविता गावंड यांनी सांगितले. तर वैशाली दरेकर, किरण मोंडकर, मंगला सुळे, शिल्पा मोरे, आदी अनेक रणरागिनींनी मध्यवर्ती शाखेबाहेर पहारा दिला आहे.
शिंदे समर्थकांना शाखेत अटकाव
शिंदे समर्थक व शिवसैनिकांमध्ये शाखेबाहेर वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिंदे समर्थक राजेश कदम यांनी शिवसैनिकांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीच्या निवासी विभागातील निवासस्थानी येण्याबद्दल सुचविले. मात्र शिवसैनिकांनी त्याला कडाडून विरोध केला. आम्ही काल (रविवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यास गेलो होतो.
आता आम्हाला खासदार डॉ. शिंदे यांच्या निवासस्थानी जाण्याची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका घेतली. तर शिवसैनिक महिला आक्रमक झाल्याचे पाहताच कदम निघून गेले. शिवसेनेच्या शाखेत शिंदे समर्थकांना यापुढे थारा देणार नाही, अशी भूमिका घेत महिला शिवसैनिकांनी शाखेबाहेर थांबून पहारा ठेवला होता.