Latest

शिवशाहीर बाबासाहेब

अमृता चौगुले

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदीप्यमान आणि गौरवशाली इतिहास सातासमुद्रापार नेण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केले. त्यांनी हे कार्य आयुष्यभर अविरतपणे केले. ते अवघ्या महाराष्ट्राला 'शिवशाहीर' म्हणून परिचित होते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने त्यांना 'महाराष्ट्रभूषण' हा पुरस्कार देऊन गौरविले. त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' हा पुरस्कारही देऊनही सन्मानित केले. बाबासाहेब मोठ्या श्रद्धेने स्वत:ला 'शिवशाहीर' म्हणवून घ्यायचे. परंतु; त्यांची खरी ओळख शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक म्हणूनच होती.

बाबासाहेब पुरंदरे हे नाव प्रथम मी केव्हा ऐकले, ते आजही मला नीटसे आठवत नाही; पण मला वाटते, बहुसंख्य मराठी माणसांप्रमाणे माझाही त्यांच्याशी पहिला परिचय झाला असावा तो त्यांच्या लेखनातूनच. प्रतापगड, राजगड, आग्रा वगैरे नावाने बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर चरित्र लिहिले आहे. शिवाय दहा खंडांनंतर लिहिलेल्या चरित्राद्वारे बाबासाहेबांनी महाराजांचे चारित्र्य, त्यांचे शौर्य, त्यांचे सद्गुण वाचकांच्या मनावर फार परिणामकारकरीतीने ठसवले आहेत.

आमच्या घरात बाबासाहेबांच्या चरित्राचे ताबडतोब आगमन झाले. मी ते दहाही खंड मोठ्या उत्सुकतेने वाचून काढले. इतिहासाशी नाते सांगणारी भाषाशैली, नाट्यमय निवेदनपद्धती, डोळ्यांसमोर प्रसंग हुबेहूब उभा करण्याचे लेखकाचे चातुर्य, यामुळे हे सर्व खंड अत्यंत वाचनीय झाले आहेत. ते वाचून लेखकाविषयी माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. शिवाजी महाराजांबद्दलची परमभक्ती हा या लेखकात व माझ्यात एक समान धागा होता. त्यामुळेही बाबासाहेबांना भेटण्याचे औत्सुक्य मला वाटत होते. त्यातूनच कधी तरी पुढे बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय झाला. साधा, निगर्वी स्वभाव, मनमोकळेपणा आणि गप्पा मारण्याची हौस, यामुळे बाबासाहेब पुरंदरेंविषयी आमच्या घरातल्या सार्‍यांनाच एक घरगुती जिव्हाळा, आपुलकी वाटू लागली. परकेपणाचा भाव पुसून गेला. बाबासाहेब हे जणू घरातले, नात्यातलेच एक माणूस, असे आम्हा सार्‍यांना वाटू लागले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय हा असा खूप दीर्घकालीन आहे. ओळख झाल्यानंतर बाबासाहेब आमच्याकडे येऊ-जाऊ लागले. मुंबईला काही कामानिमित्त येणे झाले की, बाबासाहेबांची आमच्याकडे भेट ठरलेलीच. माझ्याप्रमाणे मीना, उषा, हृदयनाथ या माझ्या भावंडांशी गप्पा मारण्यातही ते तासन्तास रंगून जात. आम्ही भावंडेही पुण्याला गेल्यावर त्यांच्या घरी जात असू. नंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचा घरोबाच निर्माण झाला. पुढे पुढे तर आम्ही त्यांना लहानसहान घरगुतीबाबतीत सल्लामसलतही विचारू लागलो. आमच्याकडच्या कौटुंबिक कार्यक्रमांत, मंगलकार्यांत बाबासाहेब आप्तभावनेने हजर राहत. त्यांचे येणे ही एक सरावाची गोष्ट होऊन बसली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर होताच. त्यांचा प्रत्यक्ष परिचय झाल्यानंतर त्यांच्या साधेपणामुळे आणि घरगुती वागणुकीमुळे त्यांच्याविषयी आम्हा सर्वांनाच एक जिव्हाळा वाटू लागला.

शिवछत्रपतींचे कार्य, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे महान चारित्र्य, याविषयी इतकी विलक्षण पूज्य बुद्धी बाबासाहेबांच्या मनात आहे, याचे मला मोठे कौतुक वाटे. महाराजांबद्दलची बाबासाहेबांची भावना क्रियाशील होती. छत्रपतींची थोरवी महाराष्ट्राला पटवून द्यावी, हाच एक ध्यास त्यांना सतत लागलेला असे. त्यासाठी व्याख्याने देणे, लेखन करणे, शारीरिक व आर्थिक झीज सोसणे, हे बाबासाहेबांनी सातत्याने चालू ठेवले होते. ते पाहताना मला आश्चर्य वाटे. बाबासाहेबांच्या व्याख्यानांनाही आम्ही सतत जात असू. शिवाजी महाराजांवरचे बाबासाहेबांचे व्याख्यान ऐकणे, हा एक अविस्मरणीय, रोमांचकारक असा अनुभव आहे.

आमच्या घराबद्दल बाबासाहेबांच्या मनात अकृत्रिम स्नेहभाव असे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला ते अनेकदा आवर्जून येत. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे झाली, त्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' ही ध्वनिमुद्रिका काढावयाचे आम्ही ठरविले. ही कल्पना बाबासाहेबांना मनापासून आवडली. त्यांनी या ध्वनिमुद्रिकेबाबतीत करता येईल ती सर्व मदत आम्हाला केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या खास शैलीने त्या गीतांना निवेदनही जोडले आहे. त्यातून बाबासाहेबांचे वक्तृत्वगुण जसे जाणवतात, त्याप्रमाणे छत्रपतींबद्दलचा त्यांचा आदरभावही शब्दाशब्दांतून प्रकट होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT