Latest

शिवमय शाहीर : बाबासाहेब पुरंदरे

अमृता चौगुले

इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास म्हणून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी शिकला; पण शिवरायांच्या त्या स्फूर्तिदायी कथांनी गेल्या साठ वर्षांतल्या पिढ्यांची छाती अभिमानाने फुलून आली, हाताच्या मुठी आवळल्या अन् डोळ्यांमधून निर्मळ आसवांची धार लागली ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांनी लिहिलेल्या-लालित्याने नटलेल्या शिवचरित्राने अन् त्यांच्या ओजस्वी वाणीने. मर्‍हाट मुलखातील दर्‍याखोर्‍यांपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत अन् लोणंदपासून लंडनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळातच तेजस्वी असलेल्या अलौकिक चरित्राची गाज गेली ती बाबासाहेबांच्या अस्सल या मातीत जन्मलेल्या शैलीतून. त्यांच्या लेखणीवर सरस्वती प्रसन्न होती. अंगावर काटा आणि नयनचक्षुत जणू कृष्णा-कोयनेचा महापूर आणणारी, गद्यात पद्याचा भास निर्माण करणारी वाङ्मौक्तिके ते प्रसवू शकले. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे बाबासाहेबांपेक्षा व्यासंगी असे अनेक इतिहासकार त्यांच्या आधीही झाले, त्यांच्या समकालातही होते अन् आहेत; पण मराठ्यांच्या मनाचाच नव्हे तर काळजाचाही ठाव घेणारे शिवप्रभूंच्या स्फटिकाप्रमाणे निर्मळ, अग्निपेक्षाही ओजस्वी अशा जीवनाचे लेखन करणारे केवळ बाबासाहेबच होते. बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या शिवचरित्राच्या पंचवीसावर आवृत्त्या झाल्या. त्यातील काही आवृत्त्या या चाळीस-चाळीस हजारांच्या होत्या, त्यामुळे लक्षावधी पुस्तके मराठीजनांच्या घरात केवळ पोहोचलीच नाहीत, तर पूजलीही गेली. या लेखनाला सहा दशके उलटली तरी त्याचे गारुड मराठी मनावरून काही हटत नाही. अफजलखान वध, आग्य्राहून सुटका, तानाजीने सर केलेला सिंहगड, प्रतापराव गुर्जरांसह सात मराठी समशेरांनी दिलेली आत्माहुती, बाजीप्रभू अन् इतर मावळ्यांमुळे पावन झालेली गजापूरची खिंड अशा एकाहून एक रोमहर्षक प्रसंगांत शिवाजी महाराजांचे दिसणारे शौर्य, 'रयतेस काडीचाही आजार देण्याची गरज नाही' अशा ओळींनी युक्त अशा त्यांनी पाठविलेल्या पत्रामुळे त्यांच्यातील दिसणारा रयतेची काळजी घेणारा राजा अशा कित्येक गोष्टी बाबासाहेबांनी ताकदीने मांडल्या आहेत. बाबासाहेबांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे वक्तृत्वही तितकेच धारदार, तितकेच कोमल, तितकेच प्रभावी. अनेक इतिहासकारांचा व्यासंग आकाशाला भिडणारा असतो; पण त्यांना त्यांचा अभ्यास आपल्या वाणीने तितक्या प्रभावीपणाने मांडता येत नाही, त्यामुळेच अशा काही ज्ञानवंतांचे व्याख्यान मात्र रूक्ष, रटाळ होते, असा अनुभव येतो. मात्र, बाबासाहेबांचे तसे नव्हते. त्यांच्या वक्तृत्वाने मेलेली मने जिवंत झाली. त्यांच्या आवाजातील चढ-उतार, प्रसंगांतील भाव अचूक-प्रभावीपणाने प्रकट करण्याचे त्यांचे सामर्थ्य यामुळे हजारो श्रोते मंत्रमुग्ध होत. मुंबईसारख्या घड्याळाच्या काट्यावर आयुष्य असलेल्या अन् व्यवहारी वृत्ती रक्तातच भिनलेल्यांच्या शहरात व्याख्यान संपण्याची वेळ झाली म्हणून रात्री बाबासाहेब एकदा थांबले, तर 'हा प्रसंग तुम्ही पुरा करा, आमची शेवटची लोकल चुकली तरी चालेल, आम्ही पहाटेच्या पहिल्या लोकलने घरी जाऊ,' असे उत्तर देण्याची बेहोशी श्रोत्यांमध्ये ते आणू शकले. केवळ शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कंठावर्धक प्रसंग गोष्टींच्या रूपात सांगणे एवढाच उद्देश बाबासाहेबांचा नव्हता. इतिहास का सांगायचा तर वर्तमानकाळात तुम्ही कसे जगावे, हे समजण्यासाठी. त्यामुळेच प्रत्येक प्रसंग सांगितल्यावर त्याचा आधुनिक काळात उपयोग कसा करायचा, याबद्दल त्यांची टिपणी असायचीच. इतिहासात रममाण होणारा; पण वर्तमानकाळाचे भान न सोडलेला असा हा इतिहासकार होता.

सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी या इतिहासकाराला दिलेली 'शिवशाहीर' ही पदवी किती यथार्थ होती, ते पटते. इतिहास वाचायचा, त्यातून बोध घ्यायचा तो राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी, हा मुद्दा ते ठासून सांगत. आपल्याकडे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव आहे, शिवाजी महाराजांनी आपल्याला या राष्ट्रीय वृत्तीची शिकवण दिली, ती आपण विसरलो आहोत, याबद्दल त्यांना खंत होती. लेखन आणि वक्तृत्व यातून शिवरायांना जनमानसात नेणार्‍या बाबासाहेबांनी आणखी एका क्षेत्रात प्रवेश केला तो म्हणजे नाट्यक्षेत्रात. 'जाणता राजा'सारखे महानाट्य उभे राहिले. त्या नाट्यातील महाराजांच्या तोंडचे संवाद ऐकणे हा केवळ अविस्मरणीय अनुभव होता. शिवकाळ आणि शिवरायांच्या जीवनातील प्रसंग जिवंत होऊन समोर उभे ठाकल्याने केवळ महाराष्ट्रवासीयच नव्हे, देशवासीयच नव्हे तर अमेरिकेतील प्रेक्षकही स्तिमित झाले. त्यांनी 'जाणता राजा'ची निर्मिती केली तशीच पुण्याच्या आंबेगावला शिवसृष्टी उभारण्याचा प्रकल्पही हाती घेतला. हा प्रकल्प अद्याप अपुरा आहे, तो पुरा होईलही; पण तो पाहायला आता बाबासाहेब असणार नाहीत, ही तमाम महाराष्ट्राची खंत राहील. महाराजांचे चरित्र मांडण्याच्या इतरांच्या प्रयत्नांचेही ते मनापासून स्वागत करीत. त्यांना खुल्या दिलाने ते मदतही करीत. त्यांच्या या दिलदार वृत्तीचा अनुभव मोहिते-पाटील यांनी अकलूजला उभारलेल्या शिवसृष्टीच्या वेळी जसा आला, तसाच शिवकाव्याची रचना करणार्‍या अगदी तरुण कवीलाही आला. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग हा स्वतंत्र काव्याचा, स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे, प्रत्येक कलावंताने-कवींनी-कादंबरीकारांनी आपली प्रतिभा त्यासाठी पणाला लावावी, असे त्यांना मनापासून वाटे. नेपोलियनच्या आयुष्यावर जेवढी पुस्तके लिहिली गेली, तेवढी पानेही त्यापेक्षाही भव्य-दिव्य असणार्‍या शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिली गेलेली नाहीत, अशी खंत ते बोलून दाखवत. बाबासाहेबांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभले, जुलैमध्ये वयाच्या शंभरीत त्यांनी प्रवेश केला तरी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. रुग्णालयात दाखल केल्यावरही 'अजून आपल्या हातून काही कामे व्हायची राहिली आहेत,' अशीच त्यांची भावना होती. अखेर काळापुढे सर्वांनाच शरणागती पत्करावी लागत असली तरी बाबासाहेबांनी केलेल्या कामांतून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या उपलब्ध असलेल्या ध्वनिफितींमधून, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शातून ते अमर राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT