कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बंगळूर येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( शिवपुतळा विटंबना ) केली. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ आक्रमक शिवसैनिकांनी पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करीत कर्नाटकात जाणार्या वाहनांना काळे फासले. काही वाहनांवर 'जय महाराष्ट्र' लिहीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोल्हापुरात शनिवारी सकाळी 11 वाजता शिवसैनिक तावडे हॉटेल येथे जमले. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'कर्नाटक सरकारचा धिक्कार असो', 'कानडी गुंडांचा निषेध असो' अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. कर्नाटक व केंद्रात भाजप सरकारचे राज्य आहे. ( शिवपुतळा विटंबना )
ज्यांनी विटंबना करण्याचे विकृत कृत्य केले आहे, त्यांना तत्काळ शोधून काढा, अन्यथा बंगळूरमध्ये जाऊन त्याला शोधून ठेचून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन थोड्या वेळाने सोडून दिले. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, राजेंद्र पाटील, राजू यादव, युवा सेनेचे मंजित माने, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, भाग्यश्री देशपांडे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते.
…अन्यथा येथील कन्नडिगांना हाकलून लावू : सर्वपक्षीय बैठकीत इशारा ( शिवपुतळा विटंबना )
शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी चौकात विविध संघटनांसह सर्वपक्षीयांतर्फे या घटनेचा धिक्कार करण्यात आला. विटंबना करणार्या समाजकंटकांना कर्नाटक सरकारने लवकर अटक करावी, अन्यथा कोल्हापूर बंद ठेवत येथील कन्नडिगांना हाकलून लावण्याचा इशारा देण्यात आला.
बंगळूरमधील सदाशिवनगरात असणार्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. बेळगावमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून याचे पडसाद उमटले. रात्री कोल्हापुरातही काही संघटनांनी छत्रपती शिवाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला. शहरातील काही कानडी व्यावसायिकांना दुकानेही बंद करण्यास भाग पाडले.
शनिवारी दुपारी 12 वाजता सर्वपक्षीयांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात बंगळूरमधील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. 'कानडी गुंडांचा धिक्कार असो', 'समाजकंटकांना अटक झालीच पाहिजे', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकारने या घटनेतील समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच असे प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा कोल्हापूर बंद ठेवत येथील कानडी व्यावसायिकांना हाकलून लावण्याचा इशारा दिला.
वाहने अडवायला भाग पाडू नका : वसंतराव मुळीक ( शिवपुतळा विटंबना )
बंगळूर शहर वसविण्यामध्ये छत्रपती शहाजीराजेंचे मोठे योगदान आहे. याचा विसर कन्नडिगांना पडला आहे. संबंधितांना अटक न झाल्यास कर्नाटकची वाहने कोल्हापुरात येण्यास अटकाव केला जाईल, अशा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, गुलाबराव घोरपडे, सुरेश कुर्हाडे, भाजपचे महेश जाधव, अशोक देसाई, मनसेचे राजू जाधव, विजय करजगार, मराठा महासंघाचे शशिकांत पाटील, अवधूत पाटील, महादेव पाटील, शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, उत्तम जाधव, प्रतीक पाटील, विराज पाटील, सोमनाथ घोडेराव, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, जाफरबाबा, रंजना जाधव, संयोगिता देसाई यांच्यासह विविध संघटना, संस्था, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बसवेश्वरांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक ( शिवपुतळा विटंबना )
कर्नाटकातील काही समाजकंटकांनी युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रवृत्ती नाहीत. याउलट कर्नाटकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अशा वृत्तीचा निषेध करत असल्याचे सेवाव—त प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी चौकात हा दुग्धाभिषेक करण्यात आला.
युवक काँग्रेसही आक्रमक,
मिरजकर तिकटी येथे शनिवारी दुपारी युवक काँग्रेसच्या वतीने बंगळूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. कन्नड रक्षक वेदिका संघटनेचा ध्वज रस्त्यावर ठेवून त्यावर श्वानाला बसविण्यात आले होते. यानंतर शाई टाकून हा ध्वज पेटविण्यात आला.
कर्नाटक पोलिसांचे वाहन अडवले
कर्नाटकातून तपासकामी आलेले काही पोलिस मिरजकर तिकटी परिसरात आले होते. चौकात वाहन उभे करून काही जण अंबाबाई दर्शनाला गेले होते. याठिकाणी आंदोलन सुरू असताना काहींना हे वाहन दिसले. आंदोलकांनी आपला मोर्चा या वाहनाकडे वळवत ते अडवून धरले. यावेळी जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांची समजूत घालून वाहन मार्गस्थ केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
कन्नड गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी : मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापुरात कन्नडिगांचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची दखल घेऊन कन्नड गुंडांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावेळी विजय करजगार, राजू दिंडोर्ले, रत्नदीप चोपडे, अॅड. आनंदराव चव्हाण, सुनील तुपे, प्रीतिश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.