Latest

शिवकुमार शर्मा : ये लम्हें ये पल, हम बरसो याद करेंगे…!

Arun Patil

शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे त्यांचं पृथ्वीतलावरचं शास्त्रीय अस्तित्व संपलंय, असं आपण म्हणू शकतो. पण त्यांच्या गाण्यांतून, मैफलींच्या ध्वनिमुद्रणातून त्यांचं भेटणं सुरूच राहील. शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया म्हणजे 'जिवाशिवा'ची जोडी. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ साधत त्यांनी सादर केलेलं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलं आहे.

बासरी आणि संतूर ही दोन्ही अतिशय नादमधूर वाद्यं. एक ओठांशी सलगी करत वेळूतून निघणार्‍या हवेला सुस्वर देणारं, तर दुसरं तारांशी सलगी करणार्‍या आक्रोडाच्या नाजूक काड्यांच्या संगतीने (ज्याला कलम म्हणतात) स्वरतरंग जागवणारं. ही वाद्यं जेव्हा वाजतात तेव्हा ती संगीत रसिकांना वेगळ्याच जगात घेऊन जातात. ही वाद्यं तशी नाजूक. मोठे आघात नव्हे, तर हळुवार स्पर्शातून स्वर जागवणारी. या दोन्ही सुरेल वाद्यांचे स्वामी एकमेकांना भेटले तेव्हा त्यांना कळलं, आपल्या दोघांचे स्वभावही तसेच आहेत. त्यामुळे त्यांची दोस्ती होणं क्रमप्राप्तच होतं. तशी ती झालीच. या दोस्तीतूनच आकाराला आली संगीतकार शिव-हरीची जोडी. सुरेल संगीताचा हा 'सिलसिला' मग सुरूच राहिला.

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर कधी कधी फिल्मस् डिव्हिजनचे माहितीपटही दिसत. त्यावेळी अचानकच (बहुधा, 'कॉल ऑफ द व्हॅली' या नावाचा) एक माहितीपट सुरू झाला. त्यात एक देखणा, गौरवर्णी, नाकेला तरुण संतूर वाजवताना दिसला. पाच ते सात मिनिटांच्या त्या माहितीपटात काश्मीरची निसर्गद़ृश्यं आणि संतूर वादनाशिवाय काहीही नव्हतं. तालाशी खेळत खेळत द्रुतगतीने संतूर वाजवणार्‍या त्या तरुणाचं कौशल्य त्याच वेळी मनात ठसलं. या तरुणाचं नाव तेव्हा कळलं होतं, पण लक्षात मात्र राहिलं नव्हतं.

'तेरे मेरे सपने' नावाच्या (देव आनंद-मुमताजच्या) सिनेमातल्या गाण्यात त्याचं संतूर पहिल्यांदा लक्षात आलं. सोबत अतिशय गोड अशी बासरी होतीच. गाणं आवडलंच! कुणीतरी सांगितलं की, त्यातलं संतूर आणि बासरी वाजवलीय शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसियांनी. पण हे नंतर खूप वर्षांनी कळलं की, मुळात या गाण्याचं म्युझिक अरेंजमेंटही या दोघांनी केलं होतं. काय सुरेख होतं ते.

या दोघांचे सूर जुळायला सुरुवात मात्र त्या आधीच झाली होती. त्यावेळी त्यांची एक संतूर आणि बासरीच्या जुगलबंदीची कॅसेट आली होती. (बहुधा, त्याचंही नाव 'कॉल ऑफ द व्हॅली'च असावं.) बासरी, संतूर आणि निसर्ग असा समसमा योग त्यात होता. ती लावावी आणि त्याच्या मोहिनीत हरवून जावं, असं त्यानंतर अनेकवेळा घडलं.

बासरीचा सूर किती नाजूक, मधुर. पण ती वाजवणारे हरिप्रसाद चौरसिया लहानपणी पैलवान होण्यासाठी आखाड्यात जात होते म्हणे. त्यांचे पहिलवान असलेले वडील त्यांना जबरदस्तीने घेऊन जायचे. पण त्यांना मनापासून आवडायचं ते, संगीत. तेही शिवकुमारासारखे तबला शिकले आधी, मग त्यांच्या हातात आली बासरी. ती ओठाला लागली आणि ती साथ मग सुटलीच नाही.

त्यावेळी चित्रपट क्षेत्रात पन्नालाल घोष यांच्या बासरीचा एकछत्री अंमल होता. ('मै पिया तेरी, तू माने या ना माने' या गाण्यात त्यांनी वाजवलेली बासरी वेडंच करते.)हरिप्रसाद यांनी आपल्या गुरू सरस्वतीदेवींना स्मरून वाजवलेल्या बासरीनेही तीच किमया केली आणि सिनेसंगीतातलं चौरसिया युग सुरू झालं. याच दरम्यान 'हरी'ला 'शिव' भेटला आणि 'जिवाशिवा'ची जोडी बनली!

शिव-हरीची जोडी जुळण्यापूर्वी शिवकुमार शर्मांना भेटला होता तो, पंचम. एस. डी. (बर्मन)चा लेक, आर. डी. सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या पंचमने तरुण शिवकुमारला आपल्या पिताश्रींकडे नेलं. थोरल्या बर्मनदांनी त्याच्यातला स्पार्क ओळखला. अनेक गाण्यांमध्ये संधी दिली. अर्थात, त्याचं संतूर फिल्मी गाण्यात पहिल्यांदा वाजलं होतं ते, 'झनक झनक पायल बाजे' मध्ये. व्ही. शांतारामना हे शंभर तारांचं संतूर भारीच आवडलं होतं. संगीतकार वसंत देसाईंशी बोलून याचा वापर कोणत्या गाण्यात करता येईल का, याची चाचपणी त्यांनी केली होती. वसंत देसाईंनी शिवकुमारला मोकळीक देत संतूर वाजवायला सांगितलं. त्याचा एका द़ृश्यात वापरही केला.

पण शिवकुमारांचे सूर जुळले ते बर्मनदांबरोबरच. अनेकदा बर्मनदा या तरुण शिवकुमारला बोलवून घेत आणि माझ्या नव्या गाण्याचा ताल बरोबर जमला आहे की नाही ते सांग, असं हक्काने सांगत ते त्यांच्यावरच्या विश्वासामुळेच. कारण त्यांचा ताल पक्का होता. कारण शिवकुमार संतूरच्या प्रेमात पडण्याआधी तबला शिकत होतेच. त्यांचे वडील शास्त्रीय गायक, त्यामुळे गाता गळाही होताच. पण त्यांच्या वडिलांनी संतूर जबरदस्तीने हातात सोपवलं. नाखुशीनेच ते स्वीकारणारे शिवकुमार या वाद्याच्या प्रेमात कधी पडले, ते त्यांचे त्यांनाही कळलं नाही. पण अंगात भिनलेला तबला त्यांच्या बोटात राहिलाच. 'गाईड'मधलं 'मोसे छल किये जा' आठवतंय. त्यात तबला काय भन्नाट वाजवलाय. बर्मनदांच्या आग्रहाखातर शिवकुमारांनीच वाजवलाय तो!

चोप्रांचा आवडता संगीतकार होता, खय्याम. 'सिलासिला'ची जुळणी जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याला संगीत खय्यामचं असणार, हे गृहीतच धरलं होतं सार्‍यांनी. पण दरम्यान, एका पार्टीत चोप्रा बोलता बोलता म्हणाले, 'खय्यामच्या संगीताला जीवनदान माझ्यामुळेच मिळालं.' खय्यामने ते ऐकलं. त्यावेळी तो काही बोलला नाही. पण नंतर जेव्हा संगीताच्या सिटींगसाठी बोलावलं तेव्हा त्याने नम्रपणे 'सिलसिला' नाकारला.

शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसियांनी चोप्रांच्या अनेक सिनेमांसाठी आपलं योगदान दिलं होतं. पूर्ण चित्रपटाचं संगीत मात्र त्यांनी कधीच दिलं नव्हतं. चोप्रांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला, तेव्हाही ते नाहीच म्हणत होते. पण चोप्रांनी त्यांना भरीस पाडलंच. या दोघांच्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीबद्दल कुणालाही शंका नव्हती. पण सिनेसंगीताची अवघड वाट ते कशी पार करतील, याबद्दल अनेकजण साशंक होते.

पण लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ साधत त्यांनी 'सिलसिला'त सादर केलेलं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलं. 'देखा ऐक ख्वाब तो…' या गाण्यात या दोघांनी एकत्रितरीत्या सादर केलेला संतूर-बासरीचा मेळ अफलातूनच! अमिताभने तत्पूर्वी सिनेमात गाणं गायलं होतं ('मेरे पास आओ मेरे दोस्तो, एक किस्सा सुनो' – मि. नटरवरलाल.) त्याचं संगीत होतं, राजेश रोशनचं. पण त्या गाण्यात वाजलेली बासरीही हरिप्रसादांचीच होती. त्यामुळे अमिताभच्या वडिलांचं (हरिवंशराय बच्चन) काव्य ('रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे') अमिताभनेच गावं, असा आग्रह जेव्हा शिव-हरींनी धरला तेव्हा अमिताभ नकार देऊ शकला नाही.

ते मस्तीखोर गाणं धम्मालच झालंय, पण त्याच सिनेमातलं 'नीला आसमा सो गया' या दस्तूरखुद्द लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याचं एक व्हर्शन अमिताभच्या आवाजात करण्याची शिव-हरींची कल्पना वेगळीच होती. त्यासाठी अमिताभ तयारच होईना. मग आपण गाणं रेकॉर्ड तरी करू; आवडलं तरंच सिनेमात ठेवू, असं म्हटल्यावर तो तयार झाला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी शिव-हरींनी पहाटे पहाटे बोलावलं होतं अमिताभला. ते रेकॉर्डिंग उत्तमच झालं. अमिताभचं एक अतिशय सुरेल गाणं म्हणून या गाण्याची ओळख आहे.

अर्थात, अमिताभचा आवाज 'सिलसिला'मधल्या अनेक गाण्यांत आहे. लताबाईंच्या सुरेल आवाजाबरोबर त्याच्या संवादांची जुगलबंदी असणारं गाणं 'ये कहाँ आ गये हम' तर खासंच. या दोघांनीही (खरं तर चौघांनीही लता-अमिताभ-हरी-शिव) त्यात आपलं उत्तम ते दिलंय.
कोणताही उत्तम आवाज सुरेल असतोच, असं शिव-हरी मानतात. म्हणूनच त्यांनी श्रीदेवीलाही गायला लावलं. 'चाँदनी'मध्ये. तिचा आवाज थोडा लहान मुलीसारखा वाटला खरा; पण त्या आवाजातला खट्याळपणा पकडायचा प्रयत्न होता तो. 'चांदनी'मधलं 'लगी आज सावनकी फिर वो झडी है'मध्ये संतूरचे बरसाती सूर आनंद देतातच; पण 'तेरे मेरे होटोंपे' हे गाणं तर पहाडी लोकगीताची लय पकडतं.
त्यातलंच दुसरं लोकगीतासारखंच गाणं म्हणजे 'मेरे हांतोमे नौ नौ चुड़ीया है', या गाण्याने तर धम्मालच केली. लग्न समारंभात (विशेषतः संगीत समारोहात) हे गाणं नाचतं आणि वाजतंच!

शास्त्रीय संगीताशी जवळीक असली तरी त्यांच्या सिनेगाण्यांत लोकसंगीत अपरिहार्यपणे दिसतं. 'अंग से अंग लगाना, सजन हमे ऐसा रंग लगाना' हे 'डर'मधलं गाणं त्याची साक्ष देतं. बाकी त्या सिनेमातल्या 'ॠतू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण' या गाण्याने तर हंगामाच केला होता.

गायक महेंद्र कपूरचा मुलगा रोहन कपूर आणि फराहाँला घेऊन आलेला सिनेमा म्हणजे 'फाँसले.' तो नीट नाही चालला. त्याचं फार दुःख नाही, पण त्यातलं 'हम चूप है की दिल सुन रहा है' हे नितांतसुंदर गाणं विस्मरणात जाऊ पाहतंय याचं नक्कीच आहे. 'शहरयार' या शायराच्या मनस्वी शब्दांना शिव-हरींनी न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्यात.

शिव-हरींनी हे नेहमीच केलं. जे काम केलं ते अतिशय प्रामाणिकपणे. मनापासून. त्यामुळेच ते अनेक मनांपर्यंत पोहोचलं.
त्यांचं चित्रपट संगीत रसिकांना आणखी हवंच होतं. पण अजून काही अजून काही, अशी रसिकांची मागणी असतानाच थांबण्यातली गंमत त्यांना माहीत होती. म्हणूनच शिखरावर असतानाच त्यांनी सिनेमांना संगीत देणं थांबवलं. त्यांच्या मैफली नंतर सुरूच राहिल्या होत्या. गेल्या काही वर्षांत त्याही थांबल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे.

शिवकुमारांच्या जाण्यामुळे त्यांचं या पुथ्वीतलावरचं शास्त्रीय अस्तित्व संपलंय, असं आपण म्हणू शकतो.
…पण त्यांच्या गाण्यांतून, मैफलींच्या ध्वनिमुद्रणातून त्यांचं भेटणं सुरूच राहील, त्यांचं थोरपण जाणवतच राहील…

'ये लम्हें ये पल,
हम बरसो याद करेंगे
ये मौसम चले गये तो
हम फरयाद करेंगे…'

हेमंत जुवेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT