एकनाथ शिंदे  
Latest

‘शिल्लक सेना’ शिवसेनेत आणण्याच्या हालचाली

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदारांना फोडून ठाकरेंची सेना आणखी खिळखिळा करण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांच्या गोटातून आखण्यात आली आहे. मुंबईतील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या सत्तासंघर्षाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेना नावाची मालकी मिळा- लेला शिंदे गट धनुष्यबाण हाती घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाचे नवे डाव टाकण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी सहा खासदार आपल्याकडे असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र, त्यातील दोन खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येतील असा दावा केला जात आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केला आहे. याशिवाय ठाकरे गटाकडे असलेले १० आमदार सुद्धा संपर्कात असून ते शिंदे गटात सामील होतील, असे वक्तव्य तुमाने यांनी केले आहे.

व्हीप काढण्याची तयारी

२७ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात शिंदे गट व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी करण्याची शक्यता आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावू शकतात. शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा व्हीप मान्य केला आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी तो पाळला नाहीतर त्यांच्यावर अपात्र- तेची टांगती तलवार असणार आहे.
विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांना विचारले असता, ठाकरे गटाचे आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हीप लागू होतो की नाही हे कायद्याचा कसा अर्थ काढला जातो यावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्यक्षात ठाकरे गटाचे आमदार काही फुटलेले नाहीत. शिंदे गटाचे आमदार फुटले आहेत. अन्य पक्षात विलीन न होता आम्हीच मूळ पक्ष असल्याचा त्यांचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी आयोगाने तो मान्य केला आहे. आता कायदा आणि नियमांचा कसा तांत्रिक अर्थ लावला जातो यावर व्हीपचा निर्णय अवलंबून आहे, असे कळसे म्हणाले. ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू झाला नाहीतर ठाकरे गटाला सभागृहात स्वतंत्र गटाचा दर्जा दिला जाऊ शकतो, असेही कळसे म्हणाले.

शिवाजी पार्क शिंदेंना

एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान या सूत्राच्या आधारावर मागील वर्षी उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि या पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची 'मालकी' आता शिंदे यांना मिळू शकते.

सामनाही ठाकरेंचाच

शिवसेनेचे मुखपत्र समजले जाणारे दैनिक 'सामना' आणि साप्ताहिक मार्मिक हे प्रबोधन प्रकाशन संस्थेचे प्रकाशन असून ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिंदे इकडे ताबा सांगू शकणार नाहीत.

शिवसेना भवन ठाकरेंचेच

शिवसेना भवनवर पक्षाची मालकी नाही. शिवाई ट्रस्टची ही वास्तू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी शिवसेना नेते लीलाधर डाके या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते, शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे शिवसेना भवन आम्ही घेणार नाही असे म्हणाले असले तरी तो त्यांचा शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे.

व्हीप जारी होणे अशक्य : अणे

राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे म्हणाले जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जात नाही, तोपर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गट परस्परांना व्हीप जारी करू शकत नाही, असे अणे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT