शिरोळ; पुढारी वृत्तसेवा : बेकायदा माती उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी मातीचे 17 ट्रक पकडले. दरम्यान, डंपर चालक, मालक व समर्थकांनी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आम्ही जगायचे तरी कसे ? कोरोनामुळे सलग दोन वर्षे डंपर थांबून आहेत, कायदेशीर वाहतूक असताना कारवाई का? असे प्रश्न करत रस्त्यावर बसतो, सर्व डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात आणून लावतो, असे सांगितले.
जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील हे डंपर मालकांना शासनाची नियमावली समजावून सांगत असताना झालेल्या गोंधळामुळे अखेर पोलिस बंदोबस्तात डंपर ताब्यात घेऊन बुवाफन महाराज मंदिर परिसरात आणून लावण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी क्षेत्रीय परिवहन विभागाला पाचारण करून क्षमतेपेक्षा जादा माती भरलेल्या डंपरवर परिवहन विभागाची दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. सर्व डंपर महसूल व आरटीओ बंदोबस्तात वजन काट्यावर आणण्यात आले. प्रत्येक डंपरचे वजन करून त्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल व तशा प्रकारचा मेमो प्रत्येक डंपरमालकाला दिला जाईल, असे विभागीय निरीक्षक उल्हास नरगुंद यांनी सांगितले. दरम्यान, डंपर चालकांनी डंपरमधील माती अन्यत्र ठिकाणी ओतून डंपरचे वजन करण्यासाठी ते काट्यावर आणले. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी महसूल व आरटीओ कर्मचार्यांना खडसावले. डंपरमधील माती ओतूपर्यंत तुम्ही काय करत होता? आतापर्यंत काय केले? लक्ष दिले नाही काय? तुमची जबाबदारी नाही काय ? असा प्रश्नांचा भडिमार करून उपस्थित कर्मचार्यांची शाब्दिक खरडपट्टी केली.
जरा तरी सौजन्य आहे का?
डंपरधारकांनी माती ओतून वजन केल्याच्या कारणातून भडकलेल्या उपजिल्हाधिकारी आनंद पाटील यांनी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना मॅडम कुठे आहेत? त्यांना जरा तरी सौजन्य आहे का? एखादा कॉलसुद्धा करता आला नाही. ही कारवाई त्यांच्या कार्यक्षेत्रात झाली आहे, असे सुनावलेे.
डंपर सडले तरी सोडू नका!
या प्रकाराला क्षमा नाही, सर्व डंपरवर कारवाई करा, सडून गेले तरी चालतील. या सगळ्यांवर शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल करून त्याची एक प्रत जिल्हाधिकार्यांना पाठवा, अशी सूचना खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी नायब तहसीलदार
जमदाडे यांना दिली.