Latest

शिखर धवनचे स्थान धोक्यात, ऋतुराज गायकवाडची निवड निश्‍चित

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय निवड समितीसाठी आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यापूर्वी एकदिवसीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन चा विजय हजारे ट्रॉफीतील खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. मात्र, युवा ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांची निवड जवळपास निश्‍चित समजली जात आहे.

जानेवारीत खेळविण्यात येणार्‍या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने यापूर्वीच रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्‍त केले आहे; पण अजून संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या मालिकेसाठी जैव सुरक्षित वातावरण आणि कार्यभार प्रबंधन लक्षात घेता कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहावे लागेल.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये गायकवाड आणि अय्यरने अनुक्रमे तीन व दोन शतके झळकावली आहेत. व्यंकटेश निश्‍चितपणे दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. तो प्रत्येक सामन्यात 9 ते 10 षटके गोलंदाजी करत आहे आणि हार्दिक अनफिट असल्याने त्याला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. त्याला जर दुखापत झाली नाही. तर, दक्षिण आफ्रिकेसाठीच्या एकदिवसीय सामन्यासाठीच्या संघात तो नक्‍की असेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आयपीएलमधील आपला चांगला फॉर्म विजय हजारे स्पर्धेतदेखील सुरूच ठेवला. त्यामुळे निवड समितीच्या अडचणी वाढल्या आहेत.

गायकवाड श्रीलंकेत दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता; पण एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेतदेखील त्याला संधी मिळाली नाही. कारण, या मालिकेत रोहित सलामीला येत होता. तसेच, राहुल किंवा इशान त्याचे जोडीदार होते. गायकवाडने विजय हजारे स्पर्धेत मध्य प्रदेश विरुद्ध 136, छत्तीसगढ विरुद्ध नाबाद 154 आणि केरळ विरुद्ध 124 धावांची खेळी केली होती.

दुसरीकडे शिखर धवनने या दरम्यान 0, 12, 14, धावांची खेळी केली. प्रशिक्षक राहुल द्रविडने ज्या पद्धतीने कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मांसारख्या खेळाडूंना संधी दिली त्याप्रमाणे धवनलादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारताने 50 षटकांची मालिका खेळली होती तेव्हा धवनने संघाचे नेतृत्व केले होते आणि श्रीलंकेतदेखील त्याने निर्णायक खेळी केली होती. त्याच्याकडे धावा करण्याची क्षमता आहे. गायकवाड संघात असला पाहिजे; पण निवड समिती धवनला संधी देऊ शकते, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.

व्यंकटेश हार्दिकसाठीही पर्याय

व्यंकटेश अय्यर हा सध्या सलामीवीर म्हणून फलंदाजीस येतो. परंतु, सध्या रोहित शर्मा, के. एल. राहुल हे दोघे त्या स्थानावर ठाण मांडून बसले आहेत. तर इशान किशन, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ हे खेळाडू रांगेत आहेत. त्यामुळे त्याला तेथे संधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो, त्यापेक्षा संघात हार्दिक पंड्याचे रिक्‍त स्थान तो भरू शकतो.

हार्दिक पंड्याचे करिअर खेळापेक्षा दुखापतींनीच जास्त गाजलेले आहे. टी-20 विश्‍वचषकातील अपयशाला तोच जास्त कारणीभूत असल्याचे बोलले जाते. दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना अन् गोलंदाजीही करू शकत असलेल्या हार्दिकची निवड का केली गेली, असा सवाल अनेकांनी केला.

आगामी टी-20 व वन-डे वर्ल्डकप स्पर्धेचा विचार करता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी हार्दिकला पर्याय म्हणून शोधाशोध सुरू केली आहे आणि व्यंकटेशच्या रुपाने त्यांना तगडा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्‍त गोलंदाजी या दोन्ही कला त्याच्याकडे असल्याने हार्दिकची 'रिप्लेसमेंट' म्हणून व्यंकटेश उजवा ठरतो.

गेल्या तीन सामन्यांतील धावा

ऋतुराज गायकवाड : 136 / 154* / 124

शिखर धवन : 0 / 12 / 14

व्यंकटेश अय्यर : 112 / 71 / 151

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT