शिकार्‍याचीच झाली शिकार  
Latest

शिकार्‍याचीच झाली शिकार; मृतदेह दरीत फेकताना काेसळून दुसऱ्या मित्राचाही मृत्‍यू

Arun Patil

आंबोली/सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या मारहाणीत मित्राचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृताचे दोन्ही मित्र कारमधून आंबोली घाटात आले. त्या ठिकाणी मृतदेह दरीत फेकत असताना फेकणाराही मृतदेहासोबत दरीत कोसळल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील असून, वाचलेल्या मित्राने या घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. तसेच या प्रकारात वाचलेला मित्र तुषार पवार याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

सातारा जिल्ह्यातील कराड येथील भाऊसो अरुण माने (वय 34, रा. गोळेश्वर माने वस्ती, ता. कराड) व तुषार शिवाजी पवार (30, शिवाजी स्टेडियम, एकवीरा कॉलनी, कराड) हे सुशांत आप्पासो खिल्लारे (रा. पंढरपूर) याच्यासह कारमधून सोमवारी (दि. 30) कोल्हापूरकडे निघाले होते. वाटेत गाडीतच या तिघांमध्ये पैशांवरून बाचाबाची झाली. भाऊसो व तुषारने सुशांत याला गाडीतच जबर मारहाण केली. या मारहाणीत सुशांतचा मृत्यू झाला. कोल्हापूर-किणी टोल नाक्याजवळ हा प्रकार घडल्याचे तुषार पवार याने कबुली जबाबात सांगितले.

या प्रकाराने हादरलेल्या भाऊसो व तुषार यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली गाठण्याचा निर्णय घेतला. यानुसार सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हे दोघेही कारमधून मृतदेह घेऊन आंबोलीत दाखल झाले. आंबोली घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी ते आले. तेथील दरीत सुशांतचा मृतदेह फेकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मृतदेह दरीत फेकताना भाऊसोचाही तोल गेला. यामुळे मृतदेहासोबत तोही सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. दरीतील खडकावर त्याचे डोके आपटल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांची कार चालूच होती. मात्र, कारची चावी दरीत कोसळलेल्या भाऊसोच्या खिशात होती. रात्रीची वेळ व सोबतचा मित्रही दरीत कोसळल्याने तुषार पवार हादरून गेला. तो त्याच परिस्थितीत कार घेऊन पुन्हा आंबोलीत आला.

मात्र, पुढे काय करावे हे त्याला सुचत नव्हते. दरम्यान, कार बंद पडली. त्याच्याजवळ चावी नसल्याने ती चालू करणे शक्य नव्हते. यामुळे संपूर्ण रात्र त्याने कारमध्येच बसून काढली. मंगळवारी सकाळी त्याने या प्रकाराची माहिती कराड येथील मित्र व नातेवाईकांना दिली. यानंतर कराड येथील नातेवाईकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी उशिरा हे दोन्ही मृतदेह दरीबाहेर काढण्यात आले. हे तिन्ही मित्र नेमके कुठे जात होते? त्यांच्यात पैशांचा काय व्यवहार होता? सुशांत खिल्लारेचा खून नेमका कशासाठी केला? याबाबत तुषार पवार हा पोलिसांना स्पष्ट माहिती देत नव्हता.

कामगार पुरविण्याकरिता घेतले होते तीन लाख

मृत सुशांत खिल्लारे (रा. पंढरपूर) हा कामगार पुरविण्याचे काम करत असे. भाऊसो व तुषार पवार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असल्याने त्यांना कामगार पुरविण्याचे आश्वासन सुशांत याने दिले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून आगाऊ तीन लाख रुपये घेतले होते. मात्र, वेळेत कामगार न पुरविल्याने भाऊसो व तुषार हे त्याच्याकडे पैशांची मागणी करत होते. पैसे देण्यास खिल्लारे हा टाळाटाळ करीत असल्यामुळे संशयित भाऊसो माने व तुषार पवार यांनी त्याला पंढरपूर येथून गाडीत घालून आणले. गेले आठवडाभर सुशांत हा माने याच्या घरी होता. त्यानंतर संशयितांनी रविवारी (दि. 29) सायंकाळी दारूच्या नशेमध्ये त्याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत खिल्लारे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच रात्री खिल्लारे याचा मृतदेह तुषार पवार याच्या गाडीत घालून आंबोली घाटात फेकण्यासाठी आणण्यात आला आणि हा पुढील प्रकार घडला, अशी माहिती जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. सुशांत खिल्लारे याचा खून सातारा-कराड येथे झाला आहे; तर त्याचा मृतदेह आंबोली घाटात फेकण्याच्या नादात तोल जाऊन भाऊसो मानेचा घाटातील खोल दरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे या खुनाचा तपास कराड पोलिस करणार आहेत. सावंतवाडी पोलिसांकडून फिर्याद नोंदवून घेतल्यावर हा तपास कराड पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT