सातारा : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातारा शहरातील शिंदे गटाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे. शिंदे यांचे सातार्यातील कट्टर समर्थक निलेश मोरे यांची रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी या संदर्भातील हालचाली वेगाने सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात संपूर्ण शिवसेना शिंदे समर्थक निलेश मोरे यांचा अपवाद वगळता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामागे उभी राहिली आहे. सेना प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरून पायउतार केले आहे. कारवाईचा वरवंटा सातार्यातही फिरणार आहे हे नक्की.
त्यापूर्वी शिंदे गटाने कारवाईचा विषय मागे ठेऊन गटबांधणीची पावले टाकायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे माजी शहर प्रमुख निलेश मोरे यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. निलेश मोरे हे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून सक्रिय असताना शिवसेनेची बांधणी सुरू केली होती. खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शहरासह जिल्ह्यात वैद्यकीय सेवा दिल्या आहेत. मोरे यांनी मुख्यमंत्र्यांची साथ न सोडल्याने आता त्यांच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदे गट सक्रिय राहणार आहे. त्यादृष्टीने राजकीय चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विश्वासू आणि निष्ठावान चेहरे शिंदे गटाकडून शोधले जात आहेत. त्याची यादी लवकरच मुख्यमंत्र्यांचे कामकाज सांभाळणार्या कोर विभागाला सादर केली जाणार आहे.
पाटण व कोरेगावातही मोर्चेबांधणी
खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे. सातारा शहरासह कराडमध्ये शिंदे समर्थक अक्षय मोहिते यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यातच आ. महेश शिंदे यांचा कोरेगावमध्ये महेश शिंदे विचार मंच तर आ. शंभूराज देसाई यांचा पाटणचा देसाई गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.