मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीत सुने झालेले शाळांचे परिसर आता सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. तब्बल दीड वर्षाने शाळांची घंटा वाजणार आहेत. पहिल्या दिवशी अनेक शाळांत प्रवेशोत्सव कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. शाळांत विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत, पुस्तक वितरण, गणवेश वाटप आदी कार्यक्रमही होणार आहेत.
कोरोनानंतर शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक करावा. विद्यार्थ्यांना शिक्षण व गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी या हेतूने शाळा सुरू होणार असल्याने शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शासकीय अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक विभागाच्या शाळांत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांनी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलवण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळांची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नसल्याचेही अनेक शाळांनी अगोदरच जाहीर केले आहे.
तशा सूचनाही शिक्षण विभागानेही दिल्या आहेत. सुरुवातीला शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. दिवसाच्या सुरूवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा होणार आहे. त्यानंतर नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बोलवण्या निर्णय काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी विचार केला असल्याचेही समजते.
सोमवारपासून शाळा सुरु होणार असल्याने काही ठिकाणी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक दिसले. रविवार असल्याने पालकांसोबत मास्क लावून शालेय साहित्य घेणसाठी पालकांसह बच्चे कंपनीची वर्दळ वाढल्याचे दिसली. खोडरबर, शॉर्पनर, स्कूल बॅग, कंपास पेटी, पाऊच, पेन, पेन्सिल, वह्या, स्टिकर, बुककव्हर आदी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी मुले आल्याचेही दुकानदारांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता मावळली असल्यामुळे मागील दीड वर्षांपासून कुलूपबंद असलेल्या राज्यातील शाळा सोमवारपासून ( 4 ऑक्टोबर) उघडणार आहेत. कोरोनाविषयीची भीती अजूनही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी 12.30 वाजता शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी संवाद साधून 'माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी' मोहिमेची घोषणा करणार आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी आणखी एक आठवडा प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दक्षिण मुंबईत तसेच मध्य मुंबई आणि पश्चिम मुंबईत बहुतांश विद्यार्थी हे लोकलने प्रवास करून कनिष्ठ महाविद्यालयात येतात.अकरावीचे प्रवेश अजूनही सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांची लस न झाल्याने ते लोकल प्रवासासाठी पात्र नाहीत. खासगी वाहनाने येणे परवडणारे नाही. त्यामुळे तूर्त अडचणी आहेत.