कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याची सुट्टी संपवून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आतूर झाले आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यास आठवडा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पुस्तकापासून गणवेशापर्यंत सर्वच साहित्याच्या दरामध्ये सुमारे 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे व्यापारी, व्यावसायिकांनी सांगितले.
दोन वर्षे कोरोनामुळे अनेक मुले शाळेतच गेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल आहे. शाळा सुरू होणार असल्याने पालक, विद्यार्थ्यांची पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तके व गणवेशाची खरेदी सुरू केली आहे.
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. कागद, शाईचे दर वाढले आहेत. प्रिंटिंगची शाई तसेच इंधन, वाहतूक खर्च वाढला आहे. याचा परिणाम वह्या, पुस्तकांवर झाला आहे. स्कूल बॅगचेही दर वाढले आहेत. काही शाळांनी यावर्षी गणवेशात बदल केला आहे. गेल्या चार महिन्यांत कपडे व गणवेश मटेरियलचे दर वाढले आहेत. रविवारी जुन्या बाजारात वह्या, पुस्तके तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने रेनकोट, छत्री खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी दरवाढीचा भार पालकांना सोसावा लागणार आहे.
जुन्या पुस्तक बाजारात जुनी पुस्तके, गाईड याबरोबरच स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी गर्दी होत आहे. दोन वर्षांनंतर जुन्या पुस्तक बाजारातील पुस्तक विक्रेत्यांनी तयारी केली आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, डी.एड., बी.एड., सीईटी, नीटसह सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकांची मागणी वाढल्याचे पुस्तक विक्रेते अजय पोळ यांनी सांगितले.