दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : मित्रपक्ष असलेल्या उध्दव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी करत राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता बनवली. यात आपली योजना रखडली व अडीच वर्षे वाया गेली. माणने शरद पवार यांच्यावर खूप प्रेम केले. पण त्यांनीच आपले पाणी अडवले. नंतरच्या काळातही या भागात पाणी आले तर जयकुमार पुन्हा आमदार होईल म्हणून काहींनी या योजनेत खोडा घालण्याचे काम केले. पण हे नियतीलाही मान्य नव्हते. त्यामुळे त्यांचे सरकार गेले अन् आपले सरकार आले. पुन्हा एकदा या योजनेला गती देण्याचे काम केले, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांनी केले.
पांगरी येथे जिहे-कठापूर पाणी उपसा योजनेची माहिती तसेच या योजनेत उत्तर माणमधील उर्वरित गावांचा समावेश व्हावा. या संदर्भात पांगरी व पंचक्रोशीतील गावाच्यावतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.सदस्य अरूण गोरे, माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, सरपंच अजिनाथ जाधव, एकनाथ कदम, विठ्ठलराव भोसले, नवनाथ शिंगाडे, नितीन इंगळे, तानाजी शिंदे, अमित भोसले, रोहिदास राऊत उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, माण खटावच्या राजकारणात 2007 साली प्रवेश केल्यानंतर या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसायचाय, या भागात कारखान्याची धुराडी पेटलेली पाहायची, कॅनॉलचे पाणी मतदारसंघात आणायचय हा संकल्प करुनच कामाला सुरूवात केली होती. तसेच आपण हे नाही करू शकलो तर आमदारकीचा राजीनामा देईन, असा शब्द दिला होता. 2013 साली किरकसालच्या बोगद्यात उरमोडीचे पाणी आणून आपण हा संकल्प पूर्ण केला. त्याचदिवशी पुन्हा एकदा दुसरा संकल्प केला जो पर्यंत जिहे-कठापूरचे पाणी आणत नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही हा संकल्प केला होता. उत्तर माणला पाणी दिल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही हा ही शब्द आपण जनतेला दिला होता. तो आता पूर्णत्वास जातोय याचा मला सार्थ अभिमान आहे. या योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि.22 जून रोजी येत आहेत. या कार्यक्रमासाठी नव्हे तर आपल्या पाण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आ. गोरे यांनी केले.
दहिवडीतील सभेला उपस्थित रहा
जिहे कठापूरचे पाणी उत्तर माणमध्ये आणण्यासाठी ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकद लावली आहे. ज्यांनी आपल्याला हे सर्व दिले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आपल्याला गुरुवार दि.22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता दहिवडी येथे मोठ्या संख्येने यायचे आहे. आपल्या मातीचा, पाण्याचा प्रश्न आहे यासाठी पक्ष, गटतट बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आ.जयकुमार गोरे यांनी केले.