Latest

शरद पवार म्हणाले, सोनियांना पंतप्रधान व्हायला विरोध होता, काँग्रेसला नाही

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माझा विरोध काँग्रेसला कधीच नव्हता. सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला होता. त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारणार नाही, असे सांगितले तेव्हाच हा विषयही संपला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील सभेत पवार यांनी काँग्रेसला विरोध केला आणि पुन्हा सत्तेसाठी त्यांच्याच दारात गेले, अशी टीका केली होती. त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

राज ठाकरे यांचे वाचन कमी आहे. ते असते तर माझी भूमिका त्यांना नक्‍की कळली असती, असा टोला पवार यांनी लगावला. आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे राज ठाकरे म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष म्हणूनच त्यांची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी घेतली. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात, सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा आणि नकलांतून लोकांची करमणूक होते, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला.

भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्‍तव्यावर बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकार याबाबत गंभीरतेने विचार करेल, असे स्पष्ट केले.

भाजपबद्दल मंगळवारच्या भाषणात राज ठाकरे यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. भाजपने सोपवलेली जबाबदारी त्यांनी निष्ठेेने पार पाडली आहे, असे पवार म्हणाले. महागाईसह राज्यासमोरील एकाही प्रश्‍नाचा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मला नास्तिक म्हणता; परंतु मी तुमच्यासारखे देव-धर्माचे प्रदर्शन कुठे मांडत नाही. मी निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा! ते एकच ठिकाण आहे आणि एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव-धर्माच्या नावाने बाजार मांडणार्‍या प्रवृत्तींवर सडकून टीका केली आणि गैरफायदा घेणार्‍यांना ठोकून काढण्याचे काम केले. आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो; मात्र कुटुंबातील लोक ते वाचत नसावेत, असे चोख प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

मी माझ्या भाषणात फुले-शाहू-आंबेडकर यांचा उल्लेख करतो त्याचा मला अभिमान आहे, असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा जोतिबा फुले यांनी रचले होते. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असेही शरद पवार म्हणाले.

मी, अजित पवार वेगळे नाही

अजित पवार यांच्यावर 'ईडी'ची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही, हा आरोप पोरकट असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार आणि मी वेगळा नाही. आमचे कुटुंब एकच आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार भाऊ-बहीण आहेत. असे असताना कारवाईतला भेदभाव तुम्हाला कसा दिसतो, असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT