Latest

व्लोदिमीर झेलेन्स्की : युक्रेनचा लढवय्या राष्ट्राध्यक्ष

Arun Patil

युक्रेनचे 44 वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे शक्तिशाली नेते व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिलंय. त्यासाठी स्वतः झेलेन्स्की रणभूमीवर उतरलेत. एक कॉमेडीयन ते थेट रशियाला भिडणारा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास म्हणूनच लक्षणीय ठरतो.

अफगाणिस्तानवर तालिबाननं हल्ला केला. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी लोकांना वार्‍यावर सोडत देशातून पळ काढला. सध्या रशिया-युक्रेनमधे युद्ध सुरू आहे. अशा वेळी युक्रेनचे 44 वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी 'मैं झुकेगा नही'चा नारा दिलाय. त्यांनी थेट रशियाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भिडायची भूमिका घेतलीय.

व्लोदिमीर झेलेन्स्की यांचा जन्म जानेवारी 1978 ला युक्रेनच्या क्रिवी रिह या शहरात झाला. हे शहर तेव्हा सोव्हिएत युनियनचं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जायचं. व्लोदिमीर यांचे आईवडील ज्यू होते. 1995 ला कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी किव्ह नॅशनल युनिव्हर्सिटीतून प्रवेश घेतला होता. 2000 ला त्यांनी कायदा विषयात पदवी पूर्ण केली.

व्लोदिमीर यांचा ओढा विनोदी अभिनयाकडे अधिक होता. 17 व्या वर्षी ते एका किव्हीयन नावाच्या कॉमेडी स्पर्धेत सहभागी झाले. 2003 ला त्यांनी टीव्ही प्रॉडक्शन कंपनी काढली होती. क्वार्टल 95 असं या कंपनीचं नाव होतं. 1+1 नेटवर्क युक्रेनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, राजकीय नेते इहोर कोलोमोईस्की यांच्या मालकीचा होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते कायम चर्चेत रहायचे. त्यांच्या 1+1 या नेटवर्कसाठी व्लोदिमीर यांनी एक टीव्ही शोही बनवला होता. काही सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं.

2015 ला 'सर्व्हंट ऑफ द पीपल' या रशियन कॉमेडी टीव्ही शोमध्ये व्लोदिमीर सहभागी झाले. त्यात त्यांनी एका शिक्षकाची भूमिका केली होती. त्यांचं भ्रष्टाचारावर व्यंगात्मक भाष्य करणारं वासिली गोलोबोरोडको हे पात्र प्रचंड गाजलं. एक शिक्षक युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष कसा होतो, हे 'सर्व्हंट ऑफ द पीपल'मध्ये दाखवण्यात आलं होतं. 2015 ते 2019 पर्यंत हा शो चालला.

युक्रेनच्या परराष्ट्र धोरणावर रशियाचा प्रभाव होता. दुसरीकडे ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, अंतर्गत बंडाळी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. 2012 नंतर हा असंतोष वाढत गेला. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टोर यानुकोविच हे रशियाच्या हातचं बाहुलं समजलं जायचे. शेवटी युक्रेनियनच्या दबावामुळे यानुकोविच यांनी देश सोडून पळ काढला आणि थेट रशियात आश्रय घेतला.

2014 ला युरोप आणि अमेरिका समर्थक पेट्रो पोरोशेन्को या नेत्याकडे युक्रेनची धुरा आली. याचवर्षी रशियन भाषिक असलेला क्रिमिया युक्रेनमधून बाहेर पडला. या सगळ्या घडामोडी घडत असताना 2015 च्या 'सर्व्हंट ऑफ द पीपल'नं व्लोदिमीरना देशभर ओळख मिळवून दिली होती. त्याच नावाने त्यांनी पक्षही काढला. पुढे 2019 ला त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. भ्रष्ट उद्योगपती समजल्या जाणार्‍या इहोर कोलोमोईस्की यांचं त्यांना समर्थन होतं.

पहिल्याच निवडणुकीत व्लोदिमीर यांनी जोरदार भाषण केलं होतं. तेव्हा त्यांच्या भाषणाची सोशल मीडियातून चर्चाही झाली. 'माझा फोटो तुमच्या कार्यालयात लावू नका. राष्ट्राध्यक्ष हा काही आयकॉन, आयडॉल किंवा एखादं पोर्ट्रेट नाही होऊ शकत. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांचा फोटो लावा आणि प्रत्येक निर्णय घेतेवेळी आधी एकदा त्या फोटोकडे पहा.' हा त्यांचा संदेश जगभर कौतुकाचा विषय ठरला होता.

प्रतिस्पर्धी असलेल्या पोरोशेन्को यांनी नवखे म्हणून व्लोदिमीर यांना हिणवलं. त्यांचं निवडून येणं रशियाच्या फायद्याचं ठरेल, असं पोरोशेन्को यांनी म्हटलं होतं. पण निवडणुकीत त्यांचा पराभव करत 73.2 टक्के मतं घेत व्लोदिमीर यांनी विजय मिळवला. 20 मे 2019 ला युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली. निवडणुकीतल्या मदतीमुळे व्लोदिमीर कोलोमोईस्की यांचे 'होयबा' ठरतील, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात व्लोदिमीर यांनी वेगळा मार्ग निवडला.

व्लोदिमीर युक्रेनचे पहिले ज्यू राष्ट्राध्यक्ष ठरले. त्यांनी भ्रष्टाचार आणि सत्ताविरोधी अशी आपली प्रतिमा तयार केली. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर युरोपातल्या फ्रान्स, पोलंडच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना भेटीचं आमंत्रणही दिलं. 25 डिसेंबर 2019 ला अमेरिकेत त्यांची भेटही झाली.

लुहान्स आणि दोनेस्क या पूर्व युक्रेनमधल्या प्रदेशांवर फुटीरतावादी गटांचं वर्चस्व होतं. या भागाला डॉनबास म्हटलं जातं. 21 फेब्रुवारीला पुतीन यांनी हे भाग युक्रेनपासून तोडले आणि त्यांना स्वतंत्र देशांचा दर्जाही दिला. या वादग्रस्त भागावर तोडगा काढण्याचं आश्वासन झेलेन्स्की यांनी निवडणुकीवेळी दिलं होतं. जुलै 2019 ला पुतीन यांना संपर्क करत रशियाने या भागातून आपलं सैन्य माघारी घेण्याच्या बदल्यात युक्रेननं इथं निवडणुकांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. वाटाघाटीतून मिन्स्क नावाचा करारही झाला. पण त्याचं पालन झालं नाही.

या भागात संघर्ष होत राहिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या भागांमध्ये रशियन पासपोर्टची घोषणा केली. मिन्स्क कराराचं हे सरळसरळ उल्लंघन होतं. त्यामुळे झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियन आणि 'नाटो' या लष्करी आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी जो बायडेन यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये 'नाटो'चं सैन्य उभं राहणं पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी धोक्याचं होतं. त्यामुळेच लुहान्स आणि दोनेस्क वेगळे करत रशियाने थेट युक्रेनसोबत युद्ध सुरू केलं.

विरोधी पक्षातल्या आणि विशेषतः रशियन समर्थक राजकीय नेत्यांवरच्या कारवायांमुळे झेलेन्स्की यांच्यावर टीकाही झाली होती. 2021 च्या पँडोरा पेपरमध्ये नाव आल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण झेलेन्स्कींनी आरोप फेटाळले. आता रशिया-युक्रेनच्या संघर्षात त्यांनी दोन हात करायची भूमिका घेतलीय. ते युक्रेनच्या सैन्यासोबत रणभूमीवर उतरलेत.

आपल्यासोबत उभं राहण्यासाठी झेलेन्स्की जगभरातल्या नेत्यांना आवाहन करतायत. अशात रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं झेलेन्स्कींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं. पण 'मला विमानातून लिफ्ट नकोय. मला दारूगोळा हवाय,' असं म्हणत त्यांनी अमेरिकेची ऑफर धुडकावून लावलीय. 'तुमच्या गोळ्या येतील, तेव्हा तुम्ही आमची छाती पहाल, पाठ नाही.' असं म्हणत ते त्यांचं खंबीर असणं दाखवून देतायत. पुतीन यांच्यासारख्या शक्तिशाली राष्ट्राध्यक्षाला त्यांनी थेट आव्हान दिलंय. व्लोदिमीर युक्रेनियनमध्येही ऊर्जा भरतायत. देशातल्या नागरिकांनाही यात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

अक्षय शारदा शरद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT