Latest

विवेक चौधरी यांच्याकडे हवाईदल प्रमुखपदाची सूत्रे

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी गुरुवारी भारतीय हवाईदल प्रमुखपदाचा भार स्वीकारला. एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया गुरुवारी हवाईदल प्रमुखपदावरून सेवानिवृत्त झाले. चौधरी यांनी त्यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत.

त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. 29 डिसेंबर 1982 रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रुजू झाले.

मार्शल विवेक चौधरी यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच हवाईदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. हवाई दलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. 'मिग' आणि 'सुखोई' ही लढाऊ विमाने उडविण्याचा 3,800 तासांचा त्यांना अनुभव आहे.

वायुदलाने राबविलेल्या सियाचीन येथील 'ऑपरेशन मेघदूत' आणि कारगिल युद्धातील 'ऑपरेशन सफेद सागर' या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, 2015 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि 2021 मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

चौधरी यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते हस्तरा येथील रहिवासी आहेत. आई- वडिलांना एकुलते असणार्‍या चौधरी यांचा कामाच्या व्यापामुळे सध्या गावाशी फारसा संबंध नाही. परंतु, गावात त्यांची जमीन असून, त्यांचा चुलत भाऊ त्याकडे लक्ष देतो.

हस्तरा येथे रेणुकादेवी मंदिर उभारणी कामात चौधरी कुटुंबाचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. वायुदल प्रमुखपदी निवड झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

नांदेडच्या सुपुत्राची गगनभरारी

एअर मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे. हवाईदलाचे उपप्रमुख बनण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाईदलाच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे कमांडर इन चीफ म्हणून काम केले आहे. एअर मार्शल चौधरी यांचा 29 डिसेंबर 1982 रोजी हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला.

3 वर्षांच्या विशिष्ट कारकिर्दीत त्यांनी भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने अवकाशात झेपावली आहेत. त्यांच्याकडे मिग 21, मिग 23 एमएफ, मिग 29 आणि सुखोई 30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाईंगसह 3,800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

चौधरी यांनी सहायक वायुसेनाप्रमुख (कार्मिक अधिकारी) आणि नंतर नवी दिल्ली येथील हवाईदल भवन स्थित हवाई दल मुख्यालयात हवाईदल उपप्रमुख म्हणून काम केले आहे. यासह त्यांनी ऑक्टोबर 2019 ते जुलै 2020 पर्यंत ईस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT