File Photo  
Latest

विलेपार्ले येथे जावयाने सासूला संपवले

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विलेपार्ले येथे राहणार्‍या शामल श्याम शिगम (61) या महिलेची तिच्याच रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या जावयाने हत्या केली. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी जावई इक्बाल अब्बास शेखला विलेपार्ले पोलिसांनी पुण्यातून अटक केली. इक्बालविरुद्ध 28 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

ही घटना शुक्रवारी रात्री विलेपार्ले येथील हनुमान रोड, सत्कार हॉटेलजवळील पितळेवाडीत घडली. तेथील रूम क्रमांक चारमध्ये शामल ही तिची मुलगी लिना, तिच्या मुलांसोबत राहात होती. लिनाचे दहा वर्षांपूर्वी इक्बालसोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. इक्बाल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत 28 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

त्याला दहिसर येथील एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा झाल्याने तो येरवडा कारागृहात होता. 1 सप्टेंबरला तो शिक्षा भोगून विलेपार्लेत परतला. मात्र पत्नी लिनाने दुसर्‍या तरुणासोबत विवाह केला असून ती गरोदर असल्याचे पतीला समजले. यामुळे वाद झाल्याने पतीने दुसर्‍या पतीला सोडून देण्यास सांगितले.

इक्बालच्या धमकीनंतर ती तिच्या मुलासोबत घरातून निघून गेली. तिचा पत्ता फक्त तिच्या आईला म्हणजे शामल शिगम हिला माहीत होता. शुक्रवारी रात्री इक्बाल हा शामल यांच्या घरी आला, तेव्हा त्याला त्याची पत्नी मुलांसोबत घर सोडून गेल्याचे समजले. त्यामुळे त्याने तिच्याकडे तिचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने लिनाचा पत्ता सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता.

या वादानंतर रागाच्या भरात त्याने शामल यांच्या डोक्यात फरशीने प्रहार करुन त्यांची हत्या केली. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शामल यांना तातडीने पोलिसांनी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT