मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनासाठी विधान भवनात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस फौजफाट्यामुळे विधान भवनाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. विधान भवनाच्या चारही बाजूला पोलिसांचे कडे उभारण्यात आले आहे. आमदारांशिवाय इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.
विधान मंडळ सचिवालयाने शनिवारी चार पानी पत्रक प्रसिद्ध केले. यात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विधान भवनाच्या आवारात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्याच वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. आमदारांचे स्वीय सहायक आणि अंगरक्षकांना विधान भवनात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी विधान भवनाच्या कार पार्किंगमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळपासूनच विधान भवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसराच्या चारही बाजूला पोलिस तैनात केले आहेत. रविवारी आणि सोमवारी सर्व प्रवेशद्वारांवर मुंबई पोलिसांचे कमांडो तैनात करण्यात येतील. बंडखोर आमदारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएफएस) संरक्षण आहे. मात्र, सीआयएफएसच्या जवानांनाही विधान भवनात प्रवेश दिला जाणार नाही.