सातारा; पुढारी वृत्तसेवा : ज्यामध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असतो, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं विचारताय तर आधी तुमच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. ती जी कारणे असतील तीच आमची समजा. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. आम्ही या मातीचे ॠण मानणारे आणि समाजामुळे आमचे स्थान आहे ही ठाम धारणा असणारे सर्वसामान्य जनतेचे आहोत, असा पलटवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला.
बँक कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बँक स्थापन केली होती का? एक बँक तुमच्या भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दुसर्या बँकेचाही गळा घोटला, सहकारी बझारचे रेस्टॉरंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही. परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळे आहे. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जनार्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पॉईंट हेरुन, त्यांच्या नाड्या आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यामुळे आहे अशी भावना तुमची. सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा आहे. दुसर्याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्य देखील समजत आहात. अहंकाराने सर्वनाश होतो हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात. अजिंक्यतारा कारखाना निवडणूक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेवून तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालु नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असे देखिल म्हणाला होता हे इतक्या लवकर कसे विसरलात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर तुमची छाती जावून, नुसत्या बरकडया राहतील याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या. तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे, असा टोलाही खा. उदयनराजे यांनी लगावला.
तुमच्यासारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी, आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे आला, त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकडे असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फंक्शनिष्ट आहात, असा टोला लगावून खा. उदयनराजे यांनी पुढे म्हटले आहे की, सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे येथुन गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही. उचल जीभ लाव टाळयाला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. 10-12 वर्षापूर्वी फक्त 9 गाडयांची ये-जा सुरु होती. आज रोजी 19 गाडयांची ये-जा सुरु आहे. सातारा शहरात रस्त्यांची कामे साविआ मार्फत वेळोवेळी झाली आहेत. आता पावसाळ्यात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचे पॅचिंगचे काम प्रशासनाने हाती घ्यावे, अशी सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे. आमच्या घरासमोरील रस्ता झाला किंवा नाही झाला तरी सामान्य सातारकरांच्या गल्लीबोळातील रस्ते झाले पाहीजेत अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना आहे.