Latest

वारसा आणि आरसा

backup backup

मग काय आबुराव? जोडून येणार्‍या दोन-तीन सुट्ट्या साजर्‍या कशा करणार म्हणता?
यंदा आपल्याला वेगळं काही म्हणायला, ठरवायला नकोच आहे. सरकारने परस्पर केलीये सुट्ट्यांची सोय.
ती कशी म्हणे?
यंदा वारसास्थळं फ्रीमध्ये बघायला देणार आहेत ना?
कोण? कुठली स्थळं? आणि फुकटात पाहण्याची चैन का म्हणे?
अहो, वारसा स्थळं. स्फूर्तिस्थानं. देशाच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून जास्तीत जास्त लोकांनी बघावीत म्हणून पुरातत्त्व विभागाने जाहीर केलीये ही योजना.
अरे वा! राष्ट्रीय स्मारकं, वारसास्थळं, सगळं नागरिकांना मोफत बघायला मिळणार म्हणता? मजाच की मग.
नुसती मजा नाही. तिच्या पलीकडे जाऊन प्रेरणा घेणं पण आहे! केवढी भव्य, उदात्त परंपरा आहे आपली.
हो तर. ती जागवण्यासाठीच 5 ते 15 ऑगस्ट. गड, किल्ले, लेणी, कस्तुरबा स्मारकासारखी राष्ट्रीय वारसास्थळं हे सगळं विनातिकीट बघा म्हणताहेत सत्ताधारी. म्हणजे लोकांचे तिकिटांचे पैसे वाचणार, तिकिटांसाठी उन्हातानात रांगा लावणंही वाचणार.
भारीये आयडिया. पोरांना दाखवा, स्वतः बघा, कायपण! नाहीतरी आपणतरी कुठे जातो हो मुद्दाम अशा जागा बघायला? तेवढी तरी इतिहासाची उजळणी करावी माणसाने.
हो. पण लगेच तिथे नवा इतिहास कोरून ठेवू नये हेही लक्षात ठेवावं.
म्हणजे काय?
म्हणजे, जाऊ तिथे आपलं नाव कोरून ठेवायची हौस आवरावी. गडकिल्ल्यांवर, बुरुज-तोफांवर आपली नावं खिळ्याने कोरणारे, हृदयाच्या आकाराचे लाल बदाम रंगवणारे, श्र र्श्रेींश र्ी चे शीलालेख कोरणारे, असे फार इतिहासप्रेमी आहेत ना आपल्यामध्ये.
त्यांच्यापुरते ते इतिहासातले राजे आणि राण्याच जसे काही! त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी जगापुढे कायमच्या ठेवायला निघालेले.
अरे पण, तुमची प्रेमंबिमं राहू द्या की तुमची तुमच्याजवळ. त्यापायी सगळा ऐतिहासिक बाज का रे बिघडवता? त्याची भव्यता, पावित्र्य यांना डागळवून का टाकता?
सोबत आधुनिक धुडगूसही असतो बरं का. पेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्या, आइस्क्रीमचे कोन, कणसं-शेंगांचा कचरा चौफेर उधळणंही चालू असतंच आपलं.
परवाच वाचलं बरं का! आपण आपल्या वारसातल्या वस्तू, स्थळं कशा स्थितीत ठेवतो हा आपल्या संस्कृतीप्रेमाचा आरसा असतो.
अरे देवा! या निकषावर आपली वारसास्थळं पाहिली तर काय दिसेल?
दिसतील, डडउ 2022, तू मेरी जिंदगी, दो हंसों का जोडा, वगैरे कोरीव अक्षरं. काही चावट चित्रंही.
अरेरे! ही अवकळा यापुढे तरी टाळूया, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचाय ना? चला, इतिहासातल्या अमृतमय आठवणी जागवूया, ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थानांचा मान ठेवून त्यांची शान वाढवूया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT