वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात गळितास येणार्या उसास पहिली उचल प्रतिटन 3,025 रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष व वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी करून केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार चालू गळीत हंगाम संपल्यानंतर सरासरी साखर उतार्यावर एफ. आर. पी. निश्चित करून होणारी उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकर्यांना देण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचेही सांगितले.
वारणा साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांना नेहमीच चांगला दर दिला असून, शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. चालू गळीत हंगामासाठी 33 हजार 246 एकर ऊस क्षेत्राची नोंद आहे. या उसाचे वेळेत गाळप होऊन साखर उताराही चांगला राहण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न राहील. चालू गळीत हंगामात सर्व सभासदांनी व शेतकर्यांनी संपूर्ण ऊस वारणा कारखान्यास पुरवठा करून गाळपाचे 16 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी केले आहे.
नुकताच 44 मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा झालेला आहे, तसेच डिस्टिलरी प्रकल्पातून प्रतिदिनी 1 लाख लिटर इथेनॉल निर्मिती त्याचबरोबर या हंगामातील रिफायनरी प्रकल्पही चालू करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.