दानोळी, मनोजकुमार शिंदे : वारणा नदी जीवनवाहिनी मानली जाते. पण याच जीवनवाहिनीचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या द़ृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. पण अलीकडच्या काळात इतर नद्यांबरोबर वारणा नदीत होत असलेले प्रदूषण हा वारणा काठावरील नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा या नद्या पूर्ण प्रदूषित झाल्या आहेत. पण वारणा नदीचे पाणी हे शुद्ध म्हणून ओळखले जात होते. पण अलीकडे वारणा नदीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषित घटकांचा वापर होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. उगम ते संगमपर्यंत काठावर असलेल्या वेगवेगळ्या कारखान्यांतले दूषित पाणी ओढ्यावाटे नदीपात्रात सोडले जाते. गावातले, शहरातले, सांडपाणी, घाण पाणी नदीपात्रात सोडले जाते. या दोन्ही कारणांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण वाढत आहे.
महापुराच्या पाण्याबरोबर आलेल्या माती, गाळ, कचरा, घाण यामुळे पाणी दूषित होते. याशिवाय नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायने पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी, स्पेंट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणे, केमिकलने माखलेले कपडे, वस्तू पाण्यात टाकणे… अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ आणि दूषित होत आहे.
अलीकडे या नदीपात्रात अनेक ठिकाणी चोरीची वाळू उपसा आणि काठावरील माती खोदाई यामुळेही वारणा प्रदूषित होत आहे. काही लोक मच्छीमारी करण्यासाठी किंवा मासे सापडावेत म्हणून पाण्यात काही विषारी औषधे, रसायने टाकतात. त्यामुळेही पर्यावरणाचा समतोल बिघडून पाणी दूषित होत आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास वारणा नदीचे पाणीही काही दिवसांतच पिण्यायोग्य राहणार नाही.
जागरुकता गरजेची
प्रत्येकाने वारणा नदी दूषित होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे. कारखान्यांनी आपले सांडपाणी नदीत न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी, झाडांसाठी वापरावे. कागद आणि साखर कारखान्यांतील मळी आणि इतर द्रवरूप पदार्थ बेजबाबदारपणे कुठेही सोडून न देता त्याची प्रक्रिया करून वापर करावा. तरच वारणा प्रदूषण कमी होऊन सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल. गेल्या पाच वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्व्हेच्या अहवालानुसार पुढील काही वर्षांत पंचगंगा, कृष्णा नदीबरोबरच वारणा नदीचेही पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. म्हणून आत्ताच जागरुक होण्याची गरज आहे.