मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता यांना खंडणीसाठी धमकावणारा आरोपी बुकी अनिल जयसिंघानी याच्या नावावर पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे.
गेली काही वर्षे तो भूमिगत झाला होता. तो वारंवार आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. पोलिसांनीही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याचा माग सुरू ठेवला. जयसिंघानी हा शिर्डी, नाशिक, मीरा रोड असा प्रवास करून गुजरातला गेला होता. ज्या दिवशी त्याची मुलगी अनिक्षा हिला अटक झाली त्याच दिवशी म्हणजे 16 मार्चला तो मीरा रोड येथे होता, अशी माहिती मिळाली आहे.
असा रचला सापळा
जयसिंघानी हा गुजरात राज्यातील बार्दोली येथे गेल्याचे स्पष्ट होताच गुन्हे शाखेने तीन पथके गुजरातला रवाना केली. गुजरातमधील पथकांनी सुरत शहर व ग्रामीण पोलिस, गोध्रा, भरोच, वडोदरा अशा स्थानिक पोलिसांच्या मदतीने जयसिंघानी याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिस आपल्या मागावर आल्याचे समजताच त्याने पोलिसांना चकवा देण्यास सुरुवात केली. बार्दोली येथे पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, तीन मिनिटे आधीच तेथून तो निसटला. त्यानंतर तो सुरतला गेला. तेथूनही पोलिस येण्याआधी पळाला.
कोटदरा, भरोच, वडोदरा यामार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना तब्बल 72 तासांच्या पाठलागानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास नाकाबंदी करून कलोल गोध्राजवळ त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. यादरम्यान, एकावेळी त्याने पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडल्याची माहिती मिळते. पोलिसांनी अनिल जयसिंघानी याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्यासोबत एक नातेवाईक होता. तो जयसिंघानी याची मुलगी अनिक्षाचा प्रियकर असल्याचे समजते. सोबतच पोलिसांनी चालकालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल्स, इंटरनेट पुरवणारी यंत्रणा जप्त केली आहे.