नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत ट्रेन सुसाट वेगाने धावणार आहे. पंतप्रधान मोदी उद्या शुक्रवारी मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
आगामी तीन वर्षांत अद्ययावत अशा 400 वंदे भारत ट्रेन दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील 75 शहरे वंदे भारत ट्रेनद्वारे जोडली जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी केली होती. तेव्हापासून रेल्वे विभाग यावर झपाट्याने काम करत आहेत. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अंमलात आणण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौर्यात हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारतची खासियत
'वंदे भारत'च्या डब्यांची बांधणी चेन्नईतील कारखान्यात करण्यात येत आहे. याअंतर्गत 400 वातानुकूलित 'वंदे भारत' गाड्यांची बांधणी होईल. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असणार आहेत. एका गाडीची प्रवासी क्षमता 1 हजार 128 आहे.