कोल्हापूर : सतीश सरीकर
गेले दीड वर्ष इच्छुकांचे डोळे लागलेल्या महापालिका निवडणूक आरक्षणाची सोडत निघाली. पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. साहजिकच सर्वच प्रभागांची रचना बदलली आहे. काही मातब्बरांना त्याचा फायदा होणार आहे. मनासारखे आरक्षण पडलेले इच्छुक निवांत झाले आहेत.
आरक्षणानंतर आता इच्छुकांची धाकधूक बंद झाली आहे. आरक्षणाची लॉटरी फुटून पत्ते खुले झाल्याने जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत. नव्या प्रभागामुळे कुणाचेच कोणत्या प्रभागावर प्राबल्य नसल्याने विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वांना संधी मिळणार आहे. आरक्षण सोडतीनंतर बहुतांश माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक निवडणूक लढविण्यासाठी सेफ झोनमध्ये आहेत.
महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली. कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. दोनवेळा प्रभाग रचना झाली. आरक्षण सोडतही काढण्यात आली. परंतु निवडणूक झाली नाही. त्यामुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले होते. परिणामी कधी एकदा निवडणूक लागते याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. आता मात्र इच्छुकांकडून निवडणुकीची लगीनघाई सुरू होणार आहे. मात्र सर्वच मातब्बर उमेदवार असल्याने एकमेकांसमोर तगडे आव्हान असणार आहे.
नव्या प्रभाग रचनेमुळे प्रभाग मोठे झाले आहेत. परिणामी पहिल्यापासूनच इच्छुकांत 'कहीं खुशी… कहीं गम…' अशी स्थिती होती. हरकतीनंतर काही प्रभागांच्या रचनेत बदल झाले आहेत. नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कुणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गाच्या प्रभागात चुरस असते. यंदा महापालिका निवडणूक पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण वगळून होत आहे. परिणामी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 92 पैकी 79 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वच माजी नगरसेवकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे.
आरक्षण सोडत निघाली असल्याने इच्छुकांनी पत्ते ओपन केले आहेत. विरोधक कोण आहेत याची चाचपणी करून उमेदवारी जाहीर केली जात आहे. महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी पत्नी किंवा आई यांना उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. सर्वसाधारण प्रवर्गात समोर तुल्यबळ उमेदवार नसल्याचे काहीजण स्वतःची उमेदवारी जाहीर करत आहेत. सोशल मीडियावर आतापासूनच उमेदवारीला उधाण आले आहे. इच्छुकांनी व्हॉटस् अॅपवर फोटो आणि प्रभागासह इच्छुक म्हणून स्टेटस लावले आहेत. इच्छुकांकडून गेल्या काही दिवसांपासून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरूच होते. आता आरक्षण सोडत निघाल्यामुळे थेट रणांगणात उतरले आहेत.
इच्छुकांचे लक्ष प्रामुख्याने सर्वसाधारण प्रवर्गावर असते. त्यात महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार होत असल्याने सर्वच माजी नगरसेवकांचे भाग विभागले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे होत्या. आरक्षण सोडतीनंतर प्रभाग क्र. 3, 10, 12, 14, 17, 20, 23, 26 या प्रभागातील प्रत्येकी दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्या आहेत. या प्रभागाकडे मातब्बर उमेदवारांच्या नजरा आहेत. परिणामी या प्रभागात चुरशीच्या लढती होणार आहेत.
आरक्षण सोडतीत तब्बल 15 प्रभागांत प्रत्येकी दोन महिलांसाठी राखीव जागा आहेत. यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. प्रभाग क्र. 4, 7, 9, 13, 28 व 30 या प्रभागांत एक अनुसूचित जाती प्रवर्ग महिला व एक सर्वसाधारण प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. प्रभाग क्र. 6, 8, 11, 16, 22, 24, 25, 27, 29 या प्रभागांत प्रत्येकी दोन सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आहेत. परिणामी 31 पैकी तब्बल 15 प्रभागांत पुरुष उमेदवारासाठी एकच जागा असेल.