योग्य आयुर्विमा म्हणजे आपल्या कुटुंबाचा दुसरा जोडीदार असतो. या जोडीदाराची गरज नसताना निवड करावा लागतो तरच तो गरजेला उपयोगी पडतो. पण त्याची निवड करताना जागरूकता दाखवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये विमा व गुंतवणूक या दोन्ही गोष्टींचा संगम असलेले पारंपरिक विमे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. विमा व गुंतवणूक या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याने या योजनेतून मिळणारा परतावा हा नगण्य येतो. दीर्घकाळात सातत्याने हप्ते भरून जो परतावा मिळतो, तो महागाईवर मात करू शकत नाही.
या गुंतवणुकीत नुकसान होते आणि मोठा विमा घेण्यासाठी मोठा हप्ता द्यावा लागतो. तो शक्य होत नाही. या निर्णयामुळे ना धड इन्शुरन्स, ना धड गुंतवणूक अशी परिस्थिती निर्माण होते. ही बाब आता सर्वांच्या लक्षात येत असल्याने अनेक आर्थिक सल्लगार फक्त टर्म प्लॅन -निव्वळ जोखमीचा विमा घ्यावा, असा सल्ला देतात अन् हे खरे आहे. दीर्घकाळासाठी आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी पुरेसा विमा कमी हप्त्यात घेणे गरजेचे असते.
एखाद्या कुटुंब प्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाला, तर त्याचे घरात येणारे उत्पन्न बंद होते आणि कुटुंबापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर निर्माण होतो. अशा घटनेला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक मिळवत्या व्यक्तीचा टर्म प्लॅन (जोखमीचा विमा) गरजेचे असते अन् तो कमी वयात घेतला, तर हप्ता कमी बसतो. जितके वय जास्त तितका हप्ता जादा द्यावा लागतो. आपले कुटुंब आपल्या पश्चात जर आर्थिकदृष्ट्या सक्षम हवे असेल, तर आपल्या उत्पन्नाच्या किमान पंधरा पट आयुर्विमा संरक्षण घ्यायला हवा. त्याचबरोबर वैयक्तिक अपघाती विमा व वैद्यकीय विमाही घेतला पाहिजे.
सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टर्म प्लान उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लिमिटेड पेमेंट टर्म प्लॅन असा आहे की, ठरावीक मुदतीपर्यंत विमा हप्ता भरायचा व दीर्घकाळासाठी जोखीम मिळेल. पहिला विमा सुरू झाल्यानंतर पहिली पाच-दहा-पंधरा वर्षे हप्ते भरावयाचे व चाळीस वर्षे-पन्नास वर्षे, जी मुदत असेल तितकी वर्षे जोखीम मिळणार आहे. असा विमा घ्यावा का? याचा खुलासा उदाहरणासह समजून घेणे आवश्यक आहे.
परवा एक पस्तीस वर्षांचे उद्योजक आले होते. त्यांच्या जवळच्या एका विमा प्रतिनिधी मित्राने दोन कोटी रकमेच्या टर्म प्लॅनबाबत माहिती सांगितली आणि –
1) पहिल्या दहा वर्ष मुदतीमध्ये प्रतिवर्षी 1,34,132/-रु. हप्ते भरावे लागणार असून, पुढील 50 वर्षे मुदतसाठी वयाच्या 85 वर्षांपर्यंत दोन कोटींचा विमा संरक्षण मिळणार आहे. या दोन कोटी विम्यासाठी 1,34,132/- प्रमाणे 10 वर्षांसाठी एकूण 13,41,320/- इतकी रक्कम भरावी लागणार आहे.
2) रेग्युलर जोखीम विमा योजनेत 50 वर्षांसाठी नियमितपणे 46,691/- इतका हप्ता भरावा लागणार आहे. रेग्युलर हप्ता पुढील 50 वर्षांसाठी 46,691/- प्रमाणे 50 वर्षांत 23,34,550/- इतकी भरावी लागते.
वरील दोन्ही योजनेत एकूण देय रकमेचा विचार केल्यास, लिमिटेड पेमेंट मुदतीचा जोखीम विमा योजनेत 9,93,230/- इतक्या कमी प्रमाणात हप्ता भरावा लागतो. हे पाहून पहिल्या दहा वर्षांत भरावे लागणारे लिमिटेड पेमेंट टर्म प्लॅन योजनाची निवड करण्यात आली होती. आणि त्यांनी घेण्याची ती मान्य केली होती. पण त्यांच्या दुसर्या मित्राच्या आग्रहाखातर सेकंड ओपीनियन घ्यावे म्हणून आले होते. फक्त दहा वर्षे हप्ते भरायचे. तेथून पुढे हप्ते भरायचे टेन्शन नाही आणि वयाच्या 85 वर्षांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. भविष्यात व्यवसाय चालेल, नाही चालेल; पैसे असतील, नसतील; या विचारावर आधारित फक्त दहा वर्षे हप्ते भरायचे व निश्चिंत राहायचे, या उद्देशाने या प्लॅनची निवड केला आहे, असे ते सांगत होते.
मी सर्व तपशील पाहिला व त्यांना प्रतिप्रश्न केला की, 'जर तुम्हाला मी आज शंभर रुपये दिले अन् पंधरा वर्षांनंतर शंभर रुपये दिले, तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट फायद्याची आहे?' त्यांच्याकडून उत्तर आले की, 'आज शंभर रुपये मिळणे कधीही फायदेशीर ठरेल.' याचा अर्थ, भविष्यातील विमा हप्ते आजच देणे विमा कंपनीसाठी चांगले आहे. पण विमाधारकासाठी नुकसानीचे ठरते. तीस-चाळीस वर्षांनंतरचा जोखीम विम्याचा हप्ता आता का द्यावा? या प्रश्नाचे आत्मचिंतन कसे कराल?
भविष्यातील विमा हप्ते लवकर दिल्याने किती मोठे नुकसान होते ते पाहणे इथे गरजेचे आहे.
पहिल्या दहा वर्षांसाठी 1,34,132/- रुपये देणे योग्य ठरेल की, पुढील पन्नास वर्षांसाठी 46,691/- रुपयेप्रमाणे हप्ते भरणे? कोणती गोष्ट फायदेशीर ठरेल?
या प्रश्नाचे उत्तर गणिती आकडेमोड करून पुढीलप्रमाणे सोडविताना, पैशाचा वेळेतील किमतीचा नियम कसा काम करतो, हे पाहणे गरजेचे ठरते. पहिल्या दहा वर्षांसाठी 1,34,132/- प्रमाणे दहा वर्षांचा हप्ता न घेता 46,691/-रुपयेप्रमाणे पुढील 50 वर्षांत विमा हप्ता भरावा लागणार. हा हप्ता घेतला तर काय होते ते पाहा. पहिल्या दहा वर्षांत जी रक्कम द्यायची आहे, त्या रकमेचे गुंतवणूक नियोजन पुढीलप्रमाणे : 1,34,132/- मधून 46,691 हप्ता वजा करून बाकी रक्कम 87,441/- प्रतिवर्षी 12% दराने पुढील दहा वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य दहा वर्षांत 16,23,735/- इतकी रक्कम होईल अन् दहा वर्षांनंतर जर या रकमेतून वरील विमा हप्ता भरण्यासाठी प्रत्येक वर्षी 46,691/-रु. रक्कम काढत राहिलो अन् बाकी रक्कम 10 टक्क्यांनी वाढवली, तर दहा वर्षांनंतर पुढच्या 40 वर्षांत पॉलिसीच्या मुदतीपर्यंत 5,07,57,300/- रुपये शिल्लक राहतील.
जर दहा वर्षांच्या मुदतीचा विमा न घेता तुम्ही नियमितपणे हप्त्याची योजना घेतली अन् दहा वर्षांत भरावी लागणारी रकमेचे गुंतवणूक नियोजन केले, तर या योजनेच्या मुदतीनंतर पाच कोटी रक्कम शिल्लक राहते. ही आकडेमोड पाहून ते उद्योजक अचंबित झाले.
भविष्यातील खर्च आज करण्यापेक्षा, भविष्यात येणार्या उत्पन्नातून खर्च करणे कधीही चांगले ठरते. आज आलेला प्रत्येक पैसा योग्य पद्धतीने गुंतवणूक करून तो वाढविण्यासाठी काटेकोरपणे व्यवस्थापन करणे ही शास्त्रशुद्ध कला आहे. ती अवगत करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी चांगला फायनान्सिअल प्लानर निवड करणे ही बाब फार महत्त्वाची आहे. आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा आहे. वयाच्या योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गरजेसाठी पुरेसा पैसा हवा असेल, तर यासाठी आपल्याकडील 'अर्था'चे 'भान' वाढवावेच लागेल!
अनिल पाटील