Latest

लस ड्रोनद्वारे प्रथमच पोहोचली दुर्गम भागात

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : दुर्गमातील दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकाला लसवंत करण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेचा भाग म्हणून ईशान्येकडील अत्यंत दुर्गम अशा भागात सोमवारी ड्रोनद्वारे यशस्वीपणे लस पोहोचवण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून औषधे पोहोचवण्याचा हा दक्षिण आशियातील पहिलाच प्रयोग असून हे व्यावसायिक उड्डाण यशस्वी झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.

मेक इन इंडिया अर्थात भारतात निर्मिती झालेल्या ड्रोन माध्यमातून मणिपूरमधील कारांगच्या बिश्‍नूपूर जिल्हा रुग्णालय ते लोकतक तलाव हे 15 किमी हवाई अंतर 12-15 मिनिटांत पार करण्यात आले. रस्तामार्गे हे अंतर 26 किमी आहे. सोमवारी 10 लाभार्थ्यांना पहिला, तर 8 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) या ड्रोन रिस्पॉन्स अँड आऊटरिच (आय-ड्रोन) सेवेचा प्रारंभ केला. जीवरक्षक लस प्रत्येकापर्यंत पोहोचल्याची खात्री या मॉडेलद्वारे होईल, असा विश्‍वास मांडवीय यांनी व्यक्‍त केला.

भारत हा भौगोलिक विविधतेने नटलेला देश आहे. जीवरक्षक औषधे पोहोचवण्यासाठी, रक्‍त नमुने संकलित करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. आपत्कालीन आणि अत्यंत तातडीच्या वेळी या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकेल. आरोग्य क्षेत्रात विशेषतः दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे आव्हान पेलण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास मांडवीय यांनी व्यक्‍त केला.'

खास दुर्गम भागांसाठी प्रकल्प

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रभावी आणि सुरक्षित लस व्यवस्थापन असूनही भारताच्या दुर्गम भागात लस पोहोचवणे आव्हानात्मक ठरत होते. या आव्हानावर मात करण्यासाठी या आय ड्रोनची रचना करण्यात आली आहे. सध्या मणिपूर, नागालँड आणि अंदमान निकोबारसाठी या ड्रोन आधारित प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

लस सुरक्षित नेण्यासाठी ड्रोनच्या क्षमतेची चाचणी करण्यासाठी आयसीएमआरने, कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने प्राथमिक अभ्यास केला आहेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT