Latest

लवंगी मिरची : वाचन संस्कृती

Arun Patil

वाचन संस्कृतीची राजकीय क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे, हे जाणून घ्यावे यासाठी घेतलेल्या या मुलाखती.

मुलाखत : 1

प्रश्न : वाचन संस्कृती वाढवली पाहिजे, यावर आपले काय मत आहे?

अध्यक्ष : वाचून कुणाचं भलं झालं आहे मला सांगा? आता बघा, आम्ही तिघे भाऊ. मोठ्या भावाला वाचायचा लय नाद, रोज काही ना काही वाचत असायचा. डीएड करून तो झाला मास्तर, म्हणजे मीच चिकटवला त्याला आपल्या संस्थेत. सायकलवर बसून खेड्यातल्या शाळेत पोरं शिकवायला जायचा. मीच मोटारसायकल घेऊन दिली त्याला. म्हटलं जिल्हा परिषद अध्यक्षाचा भाऊ आणि फिरतो सायकलवर, लोक नावं ठेवतील म्हणून. माझा दुसरा भाऊ, त्याला बी वाचायचा लय नाद. त्याने वाचायचं काहीच बाकी ठेवलं नाही. रिकामं डोकं, घरच्यांना तकलीफ देऊ लागलं म्हणून गावाकडे वाचनालय काढून दिलं. अनुदान पण मिळवून दिलं. म्हटलं, बस वाचत जेवढं वाचायचं तेवढं. त्याचा संसार मला चालवावा लागतो. आता बघा, असे मी दोन्ही भाऊ सेटल करून दिले. मला हे का जमलं तर आपलं वाचन एकदम झीरो.

पाचवीत शाळा सोडली, उरलेला टाईम गावात मारामार्‍या करत फिरणे हे एकच काम होते. लावा आणि मिटवा हेच आपलं तत्त्व. त्याच्यातून राजकारणात आलो आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. टाईमपास करण्यापेक्षा ताकदीनं राजकारण करायचं, पद मिळवायचं,पावर मिळवायची, मग पैसा येतो आपोआप. हे सगळं असल्यावर वाचणारे बी लय राहतात ना आपल्या हाताखाली. नेता म्हटल्यावर भाषण करावं लागतंच. कुठे शाळेचे गॅदरिंग, कुठे हरिनाम सप्ताह, रक्तदान शिबिर, पशुप्रदर्शन,दुकानाचे उद्घाटन असं काही पण असतं. आमचे पीए लोक भाषण लिहून देतात. आपण ते वाचायचं, जसं जमल तसं वाचायचं. आता आपण वाचतो ते तेवढंच. बाकी वाचन काहीच नाही. तुमचं वाचन मात्र चालू राहू द्या, राम राम!

मुलाखत : 2

प्रश्न : साहेब, वाचन संस्कृतीबद्दल आपलं काय मत आहे?

उत्तर : शासनाचे धोरणच आहे 'गाव तिथे ग्रंथालय'. प्रत्येक गावात ग्रंथालय असावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो.अनुदान देतो; पण लोक वाचत नाहीत तर त्याला आम्ही काय करणार? ग्रामीण भागातील लोकांना सांगितलं, वाचन करा म्हणून तर ते म्हणतात, लाईट नसते. शहरी भागात लाईट असते तेव्हा घराघरांत टीव्ही चालू असतो. मग वाचणार कोण?

प्रश्न : आपण स्वतः काय वाचन करता?

उत्तर : मंत्र्याला कुठला आलाय वेळ वाचायला? आता तुमच्याशी बोलतानासुद्धा फायलींवर सह्या करतोच आहे. तशी मला आवड आहे वाचनाची म्हणून घरी कपाट भरून पुस्तके ठेवली आहेत. दररोजचे सगळे पेपर वाचतो. म्हणजे आपल्यावर काही आरोप झाले आहेत का ते वाचतो. दिल्लीच्या बातम्या वाचतो. आपल्या महाराष्ट्राचे कसे आहे की, दिल्लीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर वादळ महाराष्ट्रात येते आणि मग आमची खुर्ची डोलायला लागते. तेवढे लक्ष ठेवावे लागते आणि तेवढेच वाचावे लागते. बाकी रोजच्या कार्यक्रमाची भाषणे पीए लोक तयार करून देतात, ती वाचत असतो. परवाचीच गंमत सांगतो, फॉरेनच्या शिष्टमंडळासमोर माझे इंग्रजीत भाषण होते. आपली इंग्रजीशी पहिल्यापासून दुश्मनी आहे. कारण काय तर आपल्या पक्षाची इंग्रजांशी दुश्मनी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT