आज हम रिक्षापे चर्चा करेंगे.
गण्याचे कान आपोआप त्यांच्याकडे वेधले गेले. आज देशका भविष्य आपके रिक्षासौख्यपे निर्भर है!
रिक्षासौख्य? असं काही असतं? फार देशाबिशाचं माहीत नाही सर, पण माझं रिक्षासौख्य फारच धोक्यात आलंय हो. मला आईबाबांना कधीकधी रिक्षाने दवाखान्यात, स्टेशनवर वगैरे घेऊन जावं लागतं. आणि नुसता त्या कल्पनेनेही मी भेदरून जातो.
ऐसा क्यूं होता है मान्यवर?
वो रिक्षावाले टाळाटाळ बहोत करते हैं. अर्धी वाटमें, आडवेतिडवे गल्लीबोळमें, जाऊ द्या. रिक्षावाले अर्ध्या वाटेत कुठेही सोडतात, कुठलाही अकल्पित रस्ता पकडतात. सुट्टे पैसे तर कोणाकडेच नसतात.
रिक्षा तो हरेक आदमीके जीवनमें कभी ना कभी आती ही है. जिंदगीके रास्ते रिक्षासे आसान होते है!
कुठले आसान सर? रिक्षावाल्यांचे नाना नखरे असतात. इथे जाणार नाही, एवढं सामान घेणार नाही. चटकन बरी रिक्षा आणि रिक्षावाला मिळवायचं फार दडपण येतं हो एकेकदा!
दडपण घेऊ नका, उलट तो उत्सव समजा, हे सांगायला तर हा संवाद योजलाय ना?
उत्सव? आमच्या आईबाबांना प्रवासाच्या शेवटी रिक्षावाल्यांनी अवास्तव पैसे मागितले की "तू लेका आम्हाला कायम खर्चातच पाडणार वगैरे मलाच ऐकून घ्यावं लागतं. मुळात रिक्षाचे ते मीटर काय नुसते शोभेसाठी बसवलेले असतात की काय, कोण जाणे.
तंत्रज्ञान ही समस्या नाहीये दोस्तों, मन ही समस्या आहे, मन भरकटू देऊ नका. मन चंगा तो कठौतीमें गंगा!
माझं मन चंगा असून काय होणार?
रिक्षा व्यावसायिकांचं मन चंगा हवं, म्हणजे पुढचा सगळा दंगा वाचेल. एकीकडे सारखं कोकलायचं, धंदा नाही, धंदा नाही, स्पर्धा फार आहे, त्या कोणा ऊबर, ओला वगैरेवाल्यांनी आमचा धंदा बशिवला वगैरे; पण आपण प्रवाशांना वेठीला धरणं कमी करावं हे कसं कळेना झालंय सर्वांना?
त्यांना म्हणावं, स्पर्धा ही संधी समजा.
स्पर्धेला स्वतःहून निमंत्रण द्या. तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण तुम्हाला पुढे जाण्याच्या असंख्य संधी देणार आहे. हीच वेळ आहे, उठा, जागे व्हा.
गण्या ऐकत होता. तेवढ्यात त्याच्या अंगावरची आणि अंगाखालची अशा दोन्ही चादरी त्वेषाने ओढल्या गेल्या. अजून उठायची वेळ झाली नाही का रे शुंभा? ऊठ, जागा हो. वगैरे रोजचा सवयीचा भडिमार कानी पडायला लागला. त्याच्या मते आईचं एकच धोरण होतं. गण्याला सुखाने झोपू म्हणून द्यायचं नाही. त्यात काल त्याने तिला जी रिक्षा आणून दिली तिने कायच्या काय पैसे लावल्याने आज ती जास्तच भडकली होती. परीक्षा आठवड्यावर आलीये तरी ऊन्हं वर येईपर्यंत बूड वर करून झोपतोय मेला.
गण्याने जाबडल्यागत विचारलं, आई, तू इथेसुद्धा? अग, रिक्षापे चर्चा याचं पाचवं पर्व चाललंय ना? तालकटोरा मैदानावर आहोत ना आपण? जळ्ळ्ं तुझं लक्षण मेल्या? झोपेतल्या झोपेत परीक्षापे चर्चामध्ये गेला हौतास होय रे? तालकटोरावर? नतद्रष्टा, असाच झोपलास तर हातात भिकेचा कटोरा घेऊन त्याच्यावर फरशीच्या तुकड्याने ताल धरायची वेळ येईल. ऊठ आधी!
– झटका