Latest

लवंगी मिरची : नो प्रॉमिस डे!

Arun Patil

परवा प्रॉमिस डे होता प्रॉमिस केलंस की नाही कुणाला? म्हणजे वचन रे! म्हणजे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, असे काही केलेस की नाही?

हे बघ जेव्हापासून राजकारण पाहायला लागलो तेव्हापासून मी बिनदिक्कत कुणालाही काहीही प्रॉमिस करत असतो. अजिबात घाबरायचं नाही. राजकारणाचा आणि प्रॉमिस डेचा संबंध काय?

अरे, प्रॉमिस आणि राजकारणाचा संबंध फार जवळचा असतो. आता बघ, निवडणुका जवळ आल्या की नाही, नाही ती वचनं दिली जातात आणि पुढे ती विसरली पण जातात. तुला सांगतो, लहानपणी पाचवीत असताना आमच्या गावाला पाझर तलाव व्हावा म्हणून एका आंदोलनामध्ये गेलो होतो. त्याला आता तीस वर्षे झाली. माझा नातू पाचवीला आला; पण अजून काही पाझर तलाव झाला नाही आणि होण्याची शक्यता दिसत नाही; पण प्रत्येक इलेक्शनला उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार पुढच्या वेळेस तुमच्या गावाला पाझर तलाव झाला नाही, तर नाव बदलून देईन, असे वचन देतो. त्या वचनाला भुलून म्हणा किंवा कसेही, आम्ही कोणाला ना कोणाला निवडून देतो. निवडून आलेला दिलेले वचन विसरतो. राजकारणी लोकांनी कुणालाही दिलेले वचन पाळल्याचे ऐकिवात नाही. अर्थात, अपवाद नक्कीच आहेत; परंतु सर्रास वचनं द्यायची आणि विसरून जायचे हा रिवाज झाला आहे दुनियेचा. कुणीच कुणाला दिलेलं वचन पाळत नाही. म्हणजे पूर्वी 'प्राण जाये पर वचन न जाये' म्हणत ते खोटेच होते तर? सध्याच्या काळात खोटे म्हणजे शंभर टक्के खोटे. आता प्राण जाये पण दुसर्‍याचे आणि वचन तर जाणारच आहे.

मागच्या इलेक्शनला एक उमेदवार प्रचाराला गावात आले होते. त्यांनी पुन्हा ते पाझर तलावाचे गुर्‍हाळ सुरू केले. मी भर सभेत उठून म्हणालो, 'साहेब, जसं मत मागायला आलात तसं अधूनमधून येऊन गावाची स्थिती बघायला पण येत जा. पाझर तलाव नको, रस्ते नको, पाण्याची टाकी नको, काही नको, फक्त दर्शन द्या साहेब!' येणार म्हणजे येणारच असे ठामपणे सगळ्यांसमोर सांगून ते गेले. आता चार वर्षे झाली. पुन्हा गावाकडे फिरकलेसुद्धा नाहीत. म्हणजे साधे दर्शनसुद्धा नाही. तू चालला मला सांगायला प्रॉमिस डे होता म्हणून अरे, ते राजकारणातील प्रॉमिस नसतं, प्रेमातलं असतं,

हे बघ ते पण मला काही सांगू नकोस. इथे लग्न झाल्यावर चार महिन्यांत घटस्फोट व्हायची वेळ यायला लागली आणि तू सांगायला प्रॉमिस डेच्या गोष्टी. संध्याकाळी दिलेलं प्रॉमिस सकाळी विसरलेले असते. काहीतरी फॅड करायचं बाकी काही नाही. रोज डे, टेडी डे, टेडी म्हणजे अस्वल, म्हणजे अस्वलाची बाहुली एकमेकाला द्यायची. खरेतर प्रेम करणारे कारटे अस्वलासारखी हेअर स्टाईल करून फिरते. मला सांग त्याच्यासाठी टेडी डे कशाला करायचा? आणि मग काल झाला प्रॉमिस डे. म्हणजे दे वचन की तोड. वचनभंग हेच ज्यांचं आयुष्य आहे ते काय कोणाला प्रॉमिस करणार? तसं नाही रे, पण एक चांगलं वळण मिळेल ना समाजाला आणि विशेषतः तरुण पिढीला.

पूर्वी आपण समजा कुणाला शब्द दिला, तर दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी लोक आयुष्यभर झटायचे; पण शब्द खाली पडू द्यायचे नाहीत. शब्द दिला म्हणजे दिला, असे अभिमानाने सांगितले जायचे आणि लोक त्याला जागायचे; पण आता शब्द देतात आणि नंतर पाठ फिरवतात. हा शब्द देणे आणि न पाळणे म्हणजे एक प्रकारचा वचनभंगच आहे. सरळ सरळ वचनभंग केला जातो आणि इकडे प्रॉमिस डे साजरा केला जातो. त्यामुळे मला वाटते की प्रॉमिस डेच्या ऐवजी वचनभंग दिवस साजरा केला पाहिजे. आता हेच बघ ना, पंधरा दिवसात माझे दहा हजार उधार घेतलेले परत देशील म्हणून तू वचन दिले होते त्याला पण आता तीन वर्षे होऊन गेली. किमान ते तरी वचन पाळ! किमान तू तरी प्रॉमिस डेचं सेलिब्रेशन कर, माझी उधारी परत करून.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT