Latest

लवंगी मिरची : खेलेगा वो खिलेगा!

Arun Patil

काय आबुराव, नेहमीसारखे नातवाच्या मॅचेस बघायला निघालात वाटतं?
मॅचेस? नायबा, यंदा शाळांमध्ये खेळांचं वातावरण नाहीये फारसं.
दोन वर्षांनंतर जरा कुठे नियमित शाळा भरताहेत, अभ्यासात व्यत्यय नको, म्हणून?
काय माहिती. दोन वर्षं सगळेच शालेय उपक्रम बंद होते हे खरंय; पण कधीतरी सुरू करायला हवेतच ना?
हो तर. उलट जास्त जोमाने करायला हवेत, एरवी बॅकलॉग कसा भरून निघणार? पण मग यंदाची क्रीडास्पर्धांची हवा अजून आली नाहीये की काय?
नाही ना. गेल्या दोन वर्षांमध्ये तालुका, जिल्हा, राज्य या पातळ्यांवर कुठल्याही महत्त्वाच्या क्रीडास्पर्धा झाल्याच नाहीत.
होय का? असेल; पण काय हो, ज्यांना खेळाची आतून आवड असते, ती पोरं खेळतातच ना?ग्राऊंडकडे धाव घेणारच ना?
ते हुंदडणं, बागडणं, दंगामस्ती करणं वेगळं पडतं
बाबुराव. कौशल्याचे खेळ वेगळे पडतात. आता पोरपणात थोडीफार दंगामस्ती व्हायचीच; पण शिस्तीचं आणि स्पर्धात्मक खेळणं मुलांना मिळायलाच हवं.
मग शाळा सुरू झाल्या आहेत म्हणताना शाळांनी घ्यावेत की आपापसात सामने.
नाही हो. तसं होत नाही. त्यामागे तेवढीच काहीतरी जोरदार प्रेरणा हवी.
भले, खेळामागे अशी खास प्रेरणा काय असणार?
असते तर. राज्यस्तरावर खेळणार्‍यांना दहावी, बारावीच्या गुणसंख्येत काही टक्क्यांची भर मिळते.सरकारी नोकर्‍यांमध्ये खेळाडूंना आरक्षण मिळतं. त्या आमिषापोटी पोरं खेळांसाठी जीवतोड मेहनत करतात. आता बिचार्‍यांपुढे असं काही ध्येयच राहिलं नाही.
असं म्हणता? सरकारी तिजोरीत खडखडाट असेल. पैशाअभावी थांबलं असेल सगळं.
तसं पण नाही. 2019 मध्ये आपल्या म्हाळुंगे क्रीडानगरीत स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा खेळासाठी भरपूर निधी देण्याची तयारी दाखवली होती आपल्या सरकारने. पंतप्रधानांनी तर 'खेलो इंडिया' ही घोषणाही दिली होती.
आठवतंय. 'खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया' ही कॅचलाईन होती तेव्हाची. मग मध्येच कुठे माशी शिंकली म्हणायची?
अंतर्गत कुरबुरी चालतात. राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. वरवर आपलं म्हणायचं, कॅच देम यंग.आणि प्रत्यक्षात मुलं यंग असताना त्यांना रखडवत ठेवायचं. असं होतं शेवटी.
म्हणजे तुमच्या मते गुणी खेळाडूंची दोन वर्षं तर वाया गेलीच आहेत आणि आता तिसरंही घालवायला निघालेत आपले लोक.
बरोब्बर. आता तरी जाग यावी त्यांना. नाहीतर, पुढे मग, 'जागतिक क्रीडाजगतात भारत मागे का?' वगैरे विषयांवर परिसंवाद भरवायला आपण मोकळे!
त्याऐवजी नवी घोषणाच बनवायची? 'खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया॥ खेलको कभी ना भूलेगा इंडिया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT