'गणपती बाप्पा मोरया! पोहोचलात सुखरूप घरी? कसे आहात? बरं चाललंय ना?'
'हं. बरंच म्हणायचं.'
'एवढे प्रसाद, मिठाया वगैरे चापून इतकाच कोमट प्रतिसाद देता गणराय?'
'हो. पोट तर तृप्त झालंय माझं; पण डोकं दुखतंय हो तो रस्त्यावरचा सगळा ठणाणा ऐकून. जरा शांत बसावं म्हणतोय. बाकी तू कसा आहे वत्सा?'
'हं. बराच आहे म्हणायचं. तुझ्या दर्शनाने मन सुखावलंय; पण अजून बाहेरची कामं काही म्हणण्यासारखी होत नाहीत विघ्नहरा. कामाला जायला अजूनही बरेचसे रस्ते मिळत नाहीहेत मोकळे.'
'का? मी तर माझं प्रस्थान हलवलं की मागेच.'
'पण, मांडव नाही हलवलेत रस्त्यातले.'
'ते काय माझं काम होतं?'
'नक्कीच नव्हतं गजानना; पण मनात आलं तरी जाता येत नाही खूप ठिकाणी. रस्ते अडवून अडवून मांडव उभे.'
'अजून नाही काढले?'
'नाही ना! काढा म्हटलं की, लगेच भांडणं होतात. परवा अंगारकीला साधं तुमच्या देवळापर्यंत येऊ शकलो नाही. मांडवामुळे गाडी वळवायला जागा नव्हती.'
'मग, मागच्या रस्त्याने यायचं की.'
'त्यात रथ पार्क केलेला.'
'अजून रथ वापरतात तुमच्यात?'
'बस्का मोरेश्वरा? तुमच्या मिरवणुकीसाठी तर आणलेला ना हंसाच्या तोंडाचा रथ? तुम्ही गावी गेलात पण रथ आहे रस्त्यावर पडून.'
'कशामुळे असेल?'
'अहो, त्याचे पार्ट वेगळे करून तो नीट पॅक करून ठेवायला माणसं मिळत नाहीत.'
'मग, बाजूच्या गल्लीमधून यायचं कीरे भक्ता.'
'तिथे खांब आणून टाकलेत.'
'कसले खांब?'
'आसपासचे जेवढे मांडव उतरवले ते सगळे बांबू, खांब, खिळेमोळे या आडवाटेवर गोळा केलेत लोकांनी. ते भिजले, कुजले, गंजले तरच उचलले जातील तिथून.'
'तोवर तो रस्ता अडवून ठेवायचा?'
'तसंच नाही म्हणता येणार अगदी. काय आहे, आता नवरात्र येईल. पुढे दसरा, दिवाळी, नाताळ, नवं वर्ष हे सगळं असेलच ओळीनं. त्या त्या वेळी नव्याने घाट घालण्यापेक्षा ही सामग्री येईल वापरता.'
'पण म्हणजे, करताकरता अर्धं वर्ष रस्ते असे वाहतुकीला निरुपयोगी ठरणार म्हणायचे का?'
'वाहतुकीपेक्षा धर्माची वाहवा जास्त भाव खाऊन जाते सध्या. तुम्ही बारीक डोळ्यांनी बघत असालच की.'
'बघतो, पण बुचकळ्यातही पडतो. तुम्हा लोकांना गैरसोयींचं काही कसं वाटत नाही रे भाविका?'
'वाटतं; पण ठसठशीतपणे बोलता येत नाही. कोणाच्या भावना कुठून, कधी, कशा दुखावतील, हे सांगता येत नाही. त्यापेक्षा रस्त्यात पडझड होऊन शरीर दुखावलं तरी चालतं आम्हाला.'
'पण, मला 'वार्ता विघ्नाची' घ्यायलाच हवी ना? मग सांगा, मी काय करावं यासाठी?'
'आमचे रस्ते आम्हाला परत मिळवून द्यावेत.'
'ते कसे म्हणे?'
'अहो, सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन. तुम्ही बुद्धिदाते ना? मग, लोकांच्या मेंदूत शिरवा की बुवा देवांचे उत्सव येणार-जाणार. नागरिकांचं दैनंदिन जीवन कायमचं अडचणीत टाकायचा कोणालाही हक्क नाही. मग, कोणी कितीही कट्टर भक्त असो.'