Latest

लवंगी मिरची : अ‍ॅडजेस्टमेंट

Arun Patil

आपल्या देशात सर्वात जास्त भर कशावर दिला जात असेल तर तो अ‍ॅडजेस्ट करून घेण्यावर. प्रत्येक जण प्रत्येकाला अ‍ॅडजेस्ट करून घ्यायला सांगत असतो. अशी अ‍ॅडजेस्टमेंट सर्वत्र सुरूच असते. घरात पाईपलाईनचे काम सुरू असते. अर्धा इंची पाईपचा तुकडा आपण घेऊन येतो. नेमका तिथे पाव इंची पाईपचा तुकडा लागणार असतो. आपण प्लंबरला सांगतो अ‍ॅडजेस्ट करून घ्या. तोही बिचारा पडत्या फळाची आज्ञा घेऊन अ‍ॅडजेस्ट करून टाकतो. सर्वात जास्त अ‍ॅडजेस्टमेंट कुठे चालत असेल तर ती लग्न ठरवताना. नियोजित वर आणि वधू एकमेकांना अत्यंत अनुरूप असतात. गोत्र, पत्रिका आणि इतर तांत्रिक बाबी जुळलेल्या असतात.

एकच प्रश्न उरलेला असतो आणि तो म्हणजे नवरा-नवरीच्या वयात सहा वर्षांचे किंवा जास्त अंतर असते किंवा दोन महिन्यांचे म्हणजे अत्यंत कमी अंतर असते. लग्न जुळण्यास कारणीभूत ठरणार्‍या आणि दोन्ही पक्षांच्या डोक्यावर हात ठेवणार्‍या मध्यस्थाचा एकच धोशा चालू असतो. वयातले अंतर फार महत्त्वाचे नाही, अ‍ॅडजेस्ट करून घ्या. वय अ‍ॅडजेस्ट कसे करायचे, हे दोन्ही पक्षांना समजत नाही. परत ते अ‍ॅडजेस्ट करायचे असते प्रत्यक्षात. कागदावर अ‍ॅडजेस्ट करता येईल; पण प्रत्यक्षात कसे करणार? हा प्रश्न उरतोच. मग अशी जोडपी नंतर आयुष्यभर एकमेकांना अ‍ॅडजेस्ट करत राहतात. जोडपे अनुरूप असावे असा सर्वांचा प्रयत्न असतो.

मुलगी चार फूट आठ इंच उंचीची असते आणि मुलगा पाच फूट सात इंच उंच असतो. क्वचित कधी मुलगी मुलापेक्षा अर्धा इंच उंच असते. अशावेळी, मुलगा/मुलगी फार चांगला/चांगली आहेत, उंचीचे तेवढे अ‍ॅडजेस्ट करून घ्या, असा आग्रह होतो. मग असे जोडपे फिरायला जाताना जोडीने न जाता चार फूट अंतर एकमेकांत ठेवून फिरायला जातात. शेवटी महत्त्वाचे काय तर अ‍ॅडजेस्ट करणे. लग्नामध्ये आहेर असेच अ‍ॅडजेस्ट केले जातात. पंचवीस लोकांना आहेर करायचा असतो आणि आहेरात देण्यासाठी केवळ पंधरा साड्या आणल्या जातात. इतर दहा महिलांचा आहेर ऐनवेळी अ‍ॅडजेस्ट करता येईल, असा गृहस्वामिनीला कॉन्फिडन्स असतो. मग सुशीलाकडून आहेरात आलेली साडी प्रमिलाला दिली जाते, प्रमिलाकडून आलेली साडी विमलला दिली जाते आणि विमलकडून आलेली साडी कमलला दिली जाते. ही सगळी अ‍ॅडजेस्टची कमाल आहे.

लग्नामध्ये टॉवेल आणि टोप्या अशाच अ‍ॅडजेस्ट केल्या जातात. आजकाल शहरांमध्ये कोणीच टोपी घालत नाही. वर पक्ष वधूपित्याला टोपी घालतो, एवढा भाग सोडला तर टोप्या कोणीच वापरत नाही. मग होते काय की, याची आलेली टोपी त्याला आणि त्याची टोपी तिसर्‍यालाच असे फिरत फिरत औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव, जालना करीत करीत ती टोपी पुन्हा कधीतरी आपल्याच डोक्यावर येत असते. आपण आहेर करताना जी टोपी दिली जाते, त्यावर काहीतरी खूण करून ठेवा आणि चार-पाच वर्षांनी आपल्याला मिळणार्‍या टोप्या तपासा, तुमची टोपी तुम्हालाच परत आलेली दिसेल. ही सगळी अ‍ॅडजेस्टची कमाल आहे.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT