लतादीदी आणि आम्हा जाधव कुटुंबीयांचा अगदी घनिष्ठ ऋणानुबंध. कोल्हापुरात आल्या की, त्या 'पुढारी' कार्यालयात मला भेटत असत. आमच्या नागाळा पार्क येथील इंदिरा निवास बंगल्यात त्या येत. जाधव कुटुंबीयांशी त्या मनमोकळेपणे बोलत. गप्पा मारीत. पन्हाळ्यावर त्या असल्या की, तिथे मी त्यांना भेटायला जात असे. प्रयाग चिखलीचे पांडबा यादव त्यांच्या समवेत असत. ते मला त्यांचा निरोप द्यायचे. त्यांच्याशी बोलताना त्या अनेक किस्से सांगत. त्यांचे बोलणे नर्मविनोदी असे. त्यांच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जाई, ते कळत नसे. मुंबईला गेलो की, 'प्रभू कुंज'ला माझी भेट ठरलेली असे. दीदी आपुलकीने स्वागत करीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पुढारी'च्या अमृत महोत्सव सोहळ्यात 'मी 'पुढारी' परिवाराचा, जाधव कुटुंबीयांचा सदस्य आहे', असे जाहीररीतीने सांगितले होते. लतादीदींचा आम्हा जाधव कुटुंबीयांना अपार जिव्हाळा लाभला. त्या आमच्या 'पुढारी' परिवाराच्या सदस्याच होत्या.
नियतीच्या त्रिकालदर्शी अद्भुत कुंचल्यातून कधी कधी विलक्षण अशी किमया आपोआपच साकारली जाते. पुन्हा तशी कलाकृती खुद्द नियतीलाही चितारावी म्हटली, तरी चितारता येत नाही. ती अजोड कलाकृती एकमेवाद्वितीयच असते. अशाच एका सुवर्णक्षणी नियतीच्या हातून एक अजरामर कलाकृती घडली. ती अद्वितीय महान कलाकृती म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर तथा लतादीदी! नियतीलाही पुन्हा प्रतिलता, दुसरी लता निर्माण करता आली नाही.
अगदी लहानपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांच्या सुरांनी माझे मन भावले होते. आमचे जाधव घराणे कलासक्त! पत्रकारितेच्या धबडग्यातही 'पुढारी'चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव तथा आबा यांनी आपली कलेची आवड जोपासलेली. कोल्हापुरातील प्रसिद्ध पॅलेस थिएटरचे 'संगीतसूर्य केशवराव भोसले' असे नामांतर त्यांनीच घडवलेले. आबांचे चुलते म्हणजे माझे चुलत आजोबा भाऊराव जाधव हे रंगभूमीवरचे प्रख्यात अभिनेते होते. तेजस्वी डोळे, धारदार नाक, रूबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या भाऊरावांनी रंगभूमी गाजवलेली होती. शिवराज नाटक कंपनीत ते प्रमुख नट होते. विक्रांत, गोरखनाथ या त्यांच्या हातखंडा भूमिका. एंट्रीलाच ते टाळी घेत. इंदूरसह अनेक शहरात त्यांच्या नावाचा डंका होता. रंगभूमी गाजवीत असतानाच, एका प्रयोगात काम करतानाच अकस्मात त्यांच्यावर मृत्यूचा घाला पडला. रंगभूमीवरच काम करताना त्यांनी कायमची 'एक्झिट' घेतली. असा ललित कलेचा वारसा घराण्यात चालत आलेला. आमच्या घरी तेव्हा ग्रामोफोन असे. त्यावर प्रामुख्याने नाट्यगीतांच्या तबकड्या लावल्या जात; पण पन्नासच्या दशकाच्या प्रारंभी चित्रसृष्टीत मन्वंतरच झाले आणि लता मंगेशकर नावाचा नवा धु्रव तारा उदयाला आला. लतादीदींची 'आयेगा आनेवाला', 'चुप चुप खडी हो', 'जिया बेकरार है', 'हवा में उडता जाये' अशा गाण्यांनी धूम माजवली होती. ती गाणी ग्रामोफोनवर वाजत असत आणि त्या अवीट गोडीने भान हरपून जात असे.
या गाण्यातून लतादीदींची ओळख झाली आणि ती पुढे कायमचीच झाली. तसे आबा आणि लतादीदींचे पिताश्री मा. दीनानाथ यांचा चांगला परिचय होता. त्यांच्या बलवंत संगीत मंडळींचे प्रयोग कोल्हापुरात होई, तेव्हा आबांची आणि मा. दीनानाथ यांची भेट होत असे. मंगेशकर कुटुंबाचे वास्तव्य त्या काळी कोल्हापुरात काही काळ मंगळवार पेठेत असे. या सार्या गोष्टी मला घरातील चर्चेतून कळत असत.
पन्नासच्या दशकात सुरू झालेल्या बिनाका गीत मालेवर दीदींच्या गाण्यांचाच पगडा असे. 'बिनाका'ची गाणी ऐकणे, हा तेव्हाचा रिवाजच बनला होता. दर बुधवारी 8 ते 9 या वेळेत रेडिओ सिलोनकडे सर्वांचे कान लागलेले असत. तेव्हापासून दीदींच्या गाण्यांनी मनामध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
महाविद्यालयीन जीवनात दीदींच्या स्वरांनी वेडच लावले म्हणा ना. 'कहीं दीप जले, कहीं दिल', यासारख्या गीतातील गूढ रम्य भावाने अंगावर शहारा येई. 'आज फिर जीने की तमन्ना है' हे गीत तरुणाईच्या ओठी असे. लतादीदींशी आमचा पूर्वापार परिचय होताच. मी 1969 मध्ये 'पुढारी'ची सूत्रे घेतली. मुंबईला माझे नेहमी जाणे-येणे असे. तेव्हा दीदींच्या गाठीभेटी होत. गप्पा होत. त्यांची भेट म्हणजे मनमोकळ्या, दिलखुलास गप्पांची मेजवानीच! त्या कोल्हापूरला येत. अंबाबाईचे दर्शन घेत. अंबाबाईला उंची साडी अर्पण करीत. त्यावेळी त्यांची भेट होत असे. पुढे 1975 च्या सुमारास त्यांनी पन्हाळ्याला बंगला बांधला. त्यांचे कोल्हापूरला येणे-जाणे वाढले. आमच्या नियमित भेटी होऊ लागल्या. एक अकृत्रिम स्नेहबंध निर्माण झाला. शिवाजी विद्यापीठाने लतादीदींना 1978 मध्ये डॉक्टरेट प्रदान केली. या सोहळ्यास दीदींनी विद्यापीठात ललित कला विभाग स्थापन करावा, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर माझी व त्यांची या विषयावर सविस्तर चर्चा झाली. कुलगुरू डॉ. बी. एस. भणगे यांनी या संकल्पनेसाठी एक समिती नेमली. माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर मी पुढाकार घेऊन विद्यापीठात ललित कला विभागाची उभारणी केली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या हस्ते संगीत पदविका विभागाचे आणि पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते ललित कला विभागाचे उद्घाटन झाले. विद्यापीठात ललित कला विभाग स्थापन करण्यामागे लतादीदींचीच प्रेरणा मिळाली.
1999 मध्ये 'पुढारी'ने साठ वर्षे पूर्ण केली. हे वर्ष 'पुढारी'च्या हीरक महोत्सवाचे. या महत्त्वाच्या सोहळ्याला भारतीय कीर्तीचा, किंबहुना आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेला पाहुणा बोलवायचे मी ठरवले आणि नेमके नाव पुढे आले, ते लतादीदींचे! दीदींना रितसर निमंत्रण दिले. दीदींनी ते तत्काळ स्वीकारले. उत्साहाने आणि आनंदाने भारलेल्या या हीरक महोत्सव सोहळ्याचे दीपप्रज्वलन दीदींच्या हस्ते झाले. दीदींनी आपल्या स्वर्गीय आवाजात 'पुढारी'ला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सोहळा संस्मरणीय झाला. मणिकांचन योग अथवा दुग्धशर्करा योग जुळून यावा, तसे झाले!
केवळ मुद्रित माध्यमापुरते मर्यादित न राहता माध्यमांच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, ही 'पुढारी'चे समूह संपादक चिरंजीव डॉ. योगेश जाधव यांची जिद्द! त्यांनी '94.3 टोमॅटो एफ.एम.' या रेडिओ केंद्राची स्थापना केली. अर्थात, त्याचे उद्घाटन लतादीदींच्या हस्ते करायचे, हे ओघानेच आले. 21 सप्टेंबर 2007 रोजी दीदींच्या दैवी आवाजाने या नव्या केंद्राचे उद्घाटन झाले. दीदींनी या केंद्राची भरभराट होईल, असा शुभाशीर्वाद दिला. गानतपस्विनीचा आशीर्वाद फळा-फुलाला आला. 'टोमॅटो एफ.एम.' पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनला आहे.
खर्या अर्थाने भारताच्या प्रतिनिधी म्हणून लतादीदींचेच नाव घेतले जाते. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी असंख्य रसिकांचे मनोरंजन केले. त्यांना विरंगुळा मिळवून दिला. क्रिकेट आणि फोटोग्राफी हे त्यांचे आवडीचे विषय. त्यात त्या रममाण होतात. शतका-शतकातून एकदाच असे महान व्यक्तिमत्त्व पृथ्वीतलावर अवतरते. त्यांचा द़ृढ स्नेह आम्हाला, आमच्या कुटुंबीयांना लाभला, ते क्षण सोनेरी होऊन गेले. त्यांच्या स्मृतीस आमची भावपूर्ण आदरांजली!