Latest

लक्ष्मीची पाऊले : आर.बी.आय.च्या नव्या पतधोरणाचा परिणाम

अमृता चौगुले

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक, तीन दिवसांची बैठक बुधवारी 4 मे रोजी संपली आणि त्यात एकमताने यावेळी रेपो दरात बदल करण्याचा निर्णय घेतला. 0.40 पॉईंटची वाढ करण्यात आली. आता हा दर 4.40 टक्के 21 मेपासून अंमलात येईल. रेपो दराचा फटका बँकांना व पर्यायाने ग्राहकांना बसतो. वाढलेल्या दरामुळे वाहन कर्जे व गृहकर्जे अर्धा टक्क्याने वाढतील. ही कर्जे सर्वसाधारपणे मध्यम वर्गीयांनाच लागत असल्यामुळे त्यांच्या मासिक/त्रैमासिक हप्त्यात वाढ होईल. बँकांच्या कॅश रिझर्व्ह रेशिओ (CPR) चे प्रमाण अर्धा टक्क्याने वाढेल.

बँकांकडील 87 हजार कोटी रुपयांची रोकड कमी होणार आहे. गेले तीन महिने सतत चलनवाढीचा दर सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ऑगस्ट 2018 नंतर प्रथमच पावणेतीन वर्षांनी रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्ज मिळते, त्या दराला 'रेपोदर' असे म्हटले जाते. रेपो दराचे पूर्वीचे नाव 'बँकरेट' असे होते. बँका कर्जे देताना पूर्वी, 2 वा 3 टक्के बँकरेटच्या वर असा उल्लेख करीत असत. पण किमान इतका दर असा उल्लेख करीत.

मे 2020 मध्ये जितक्या दराने रेपो दर कमी केला गेला होता. तितक्याच दराने सध्याची वाढ झाली आहे. रिव्हर्स रेपो दरात मात्र यावेळी काहीही बदल नाही. तो 3.35 टक्के इतकाच ठेवला गेला आहे.
फेब्रुवारी 2019 पासून रेपो दरात अडीच टक्के कपात केली होती. दोन वर्षांपासून कर्जाचे दरही 4 टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्यात आले होते. मात्र आता महागाई सतत वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरणाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. निर्देशांक सुमारे 1300 अंकांनी, तर निफ्टी सुमारे 391 अंकांनी कमी झाला आहे. मुंबई शेअर बाजारात 2548 कंपन्यांचे समभाग घसरले, तर सुमारे 820 कंपन्यांचे समभाग वाढले गेले. कित्येक महिने गाजावाजा होत असलेली बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाची समभाग विक्री 4 मे रोजी सुरू झाली. पॉलिसीधारक, कर्मचारी व सर्वसामान्य गुंतवणूकदार यांच्यासाठी खुली झाली. पहिल्या दिवशी समभागांसाठी 67 टक्के मागणी आली. पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या समभागांसाठी जवळजवळ दुप्पट मागणी आली. कर्मचार्‍यांसाठी राखून ठेवलेल्या समभागांसाठी 117 टक्के मागणी आली. ही समभागांची विक्री 9 मेपर्यंत चालू ठेवली गेली होती. 8 मे अखेरपर्यंत म्हणजे रविवारीसुद्धा ही समभाग विक्री चालू राहिली. त्यासाठी बँका रविवारीही चालू ठेवण्यात आल्या होत्या.

उन्हाळा वाढत असल्यामुळे एअर कंडिशनर्सच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली. वर्षभरात सुमारे 1 कोटी एअर कंडिशनर्स विकले गेले. फक्त एकाच एप्रिल महिन्यात 17॥ लाख एअर कंडिशनर्स विकले गेले. एप्रिल 2021 पेक्षा एप्रिल 2022 मध्ये विक्रीत सुमारे 30 ते 35 टक्के वाढ झाली.

सध्या लग्नसराई असल्यामुळे सोने व सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. रब्बी गव्हाचे उत्पादनाचा अंदाज सर्वसाधारण मार्च, एप्रिलमध्ये येतो. गव्हाचे उत्पादन यंदा 10.5 कोटी टन झाले असावे, असा अंदाज आहे. 2020-2021 मध्ये 10.96 कोटी टन गव्हाचे उत्पादन होते. मूळ व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा सहा टक्क्यांनी हे कमी आहे. केंद्र सरकारने यंदाच्या रब्बी हंगामात गहू खरेदीचे प्रमाण अंदाजे 1.95 कोटी टनापर्यंत कमी केले आहे. 13 वर्षांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

-डॉ. वसंत पटवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT