Latest

एकनाथ शिंदें यांना मुख्यमंत्रिपदाचा मुकुट! पण महत्त्वाची खाती भाजपकडे

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रिपदाचा मुकुट जरी एकनाथ शिंदे यांना दिला असला तरी महत्त्वाची खाती घेण्याचा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असून शिवसेनेकडे असलेली खाती शिंदे गटाकडे देण्यात येणार आहेत. यात अर्थात काही खात्यांची अदलाबदल होईल.

आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, परिवहन, पर्यावरण, राज्य रस्ते विकास, वने, पाणीपुरवठा, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी अशी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे होती. ही खाती शिंदे गटाकडे जातील. मुख्यमंत्री शिंदे हे नगरविकास खात्यासह सामान्य प्रशासन, राज्य रस्ते विकास आदी खाती स्वतःकडे ठेवतील. पण शिंदे गटाला अर्थ आणि गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम या खात्यांची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे गृह आणि अर्थ ही खाती ठेवतील. जलसंपदा हे खाते राष्ट्रवादी आणि भाजपच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जलसंपदा खाते भाजप सोडणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जलसंपदा विभागातील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीकडील गृह, अर्थ व नियोजन, ग्रामविकास, समाजकल्याण, जलसंपदा, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण, उत्पादन शुल्क तर काँग्रेसकडील महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास वर्ग, दुग्धविकास, महिला व बालकल्याण आदी खाती भाजपला हवी आहेत. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार, तर 11 अपक्ष आणि छोटे पक्ष यांचे आमदार आहेत.

13 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी शिंदे गटात जोरदार रस्सीखेच आहे. शिंदे यांची आपल्या गटात मंत्रिपदे देताना कसरत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, ग्रामविकास, जलसंपदा या महत्त्वाच्या खात्यांसाठी स्पर्धा आहे. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला केवळ दहा मंत्रिपदे आली होती. पण यावेळी शिंदे गटाला जास्त मंत्रिपदे द्यावी लागणार आहेत.

रिमोट कंट्रोल भाजपकडे

भाजप आणि त्यांचे समर्थक 120 आमदार भाजपकडे असताना त्यांनी राजकीय नफ्याचा विचार करून मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. परंतु ही खेळी करताना या सरकारचा रिमोट कंट्रोल हा भाजपकडे असावा, अशी खात्यांची व्यूहरचना आमची असेल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT