कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी सोमवारी 'पुढारी' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी सहकार भारतीच्या वतीने महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे संकलन केलेला 'सहकारमहर्षी' हा संदर्भ ग्रंथ डॉ. योगेश जाधव यांना भेट दिला. तसेच, गुजरात आणि कर्नाटकातील सहकार चळवळीवर असे संदर्भ ग्रंथ काढणार असल्याची माहिती दिली.
डॉ. योगेश जाधव यांच्याशी चर्चा करताना त्यांनी महाराष्ट्राचे सहकार चळवळीतील योगदान मोठे असल्याचे सांगितले. याचबरोबर गुजरात आणि कर्नाटक येथेही सहकार चळवळ जोमात असल्याचे स्पष्ट करताना, मराठे यांनी जुन्या मुंबई राज्यात सहकार चळवळीची बीजे रुजली. राज्य पुनर्रचनेनंतर काही भाग गुजरात आणि कर्नाटकात गेला असला, तरी जुन्या मुंबई राज्यातील रुजलेल्या सहकारी चळवळीचा तिथेही विस्तार झाल्याचे सांगितले.
गुजरातमध्ये दूध संकलनात सहकार मोठ्या प्रमाणात आहे. याची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. त्याचप्रमाणे इफ्कोची उलाढालही मोठी आहे. ज्यावेळी संदर्भ ग्रंथ होईल त्यावेळी गुजरातचा सहकार चळवळीत एकूण किती हिस्सा आहे हे स्पष्ट होईल; असे सांगून मराठे यांनी कर्नाटकातही सहकार चळवळ चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे सांगितले.
या दोन्ही ठिकाणच्या चळवळींचा महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा जसा 'सहकारमहर्षी' हा संदर्भ ग्रंथ सहकार भारतीने प्रकाशित केला आहे तसेच हे ग्रंथ असतील, असे मराठे म्हणाले.
अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याचे सांगून सतीश मराठे म्हणाले की, अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्युनल, इनसॉल्व्हन्सी अँड बँक बोर्ड यासारख्या संस्थांच्या स्थापनेचा केंद्र सरकारने जो निर्णय घेतला, त्यामुळे मरगळ झटकून देशाची अर्थव्यवस्था गतिमान होत आहे. हे निर्णय क्रांतिकारी असल्याचे नजीकच्या काळातच स्पष्ट होईल. कारण, ज्या प्रकारे आता अर्थव्यवस्था गती घेत आहे हे या संस्थात्मक निर्णयांचे यश आहे.
अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सरकारी क्षेत्रात आहे तशाच खासगी क्षेत्रात अशाप्रकारे 28 ते 29 कंपन्या आहेत. यापैकी 27 कंपन्या एकट्या मुंबईत असल्याचे सांगून, मराठे यांनी केवळ दोन-तीन संस्थाच दिल्लीत असल्याचे स्पष्ट केले. या खासगी संस्थांचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. योगेश जाधव यांनी दै. 'पुढारी' प्रकाशनाचे ग्रंथ सतीश मराठे यांना भेट दिले. सहकार भारतीचे प्रदेश संघटनमंत्री संजय परमणे, पंचगंगा बँकेचे संचालक डी. के. जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक दीपक फडणीस आणि सहकार सुगंधचे संदीप कुलकर्णी उपस्थित होते.