नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने घोषित केलेली 75 हजार रिक्त पदांवरील शासकीय भरती कालबद्ध वेळेत पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. या भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये आणि भरती प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडावी यासाठी टीसीएससारख्या नामांकित कंपन्यांची भरतीसाठी निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. प्रकाश आबिटकर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी विभाग आणि जिल्हा पातळीवर यंत्रणा उपलब्ध करून देऊन भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी टीसीएस कंपनीबाबत बाहेरील राज्यात तक्रारी असल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.
चर्चेला उत्तर देताना केसरकर म्हणाले, शासकीय भरतीबाबत सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार एक वर्षाच्या आत विशिष्ट कालमर्यादेत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शालेय शिक्षण विभागातील पदांसाठी येत्या फेब्रुवारीपर्यंत परीक्षा घेण्यात येईल आणि मार्च महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य पदांच्या भरतीसाठी नामांकित कंपन्या निवडण्यात आल्या आहेत. त्यापैकी टीसीएस ही नावाजलेली कंपनी आहे. एकाचवेळी एक कोटी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची या कंपनीची क्षमता आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. भरतीत गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेताना परीक्षेसाठी उमेदवारांना जवळचे केंद्र देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.