गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफ व आ. राजेश पाटील यांच्यात थेट लढत झाल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. या निवडणुकीत आ. मुश्रीफ यांनी एकहाती बाजी मारत पाटील यांना दणका दिला असून, याचे दूरगामी परिणाम आगामी राजकारणावर दिसून येणार आहेत.
आ. पाटील यांचे मागील निवडणुकीतील प्रतिस्पर्धी संग्रामसिंह कुपेकर व अप्पी पाटील यांना जवळ करत वेगळी व्यूहरचना केल्याने त्याचा आ. पाटील यांना फटका बसणार आहे. याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणात आ. मुश्रीफ हे आ. पाटील यांना फारसे जुळवून घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे 'गोडसाखर'च्या निवडणुकीत ही झालेली घडामोड राष्ट्रवादीच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक घडामोडींवर प्रभाव टाकणारी ठरली आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार संध्यादेवी कुपेकरांनी विधानसभेवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटात निर्माण झाल्यानंतर राजेश पाटील यांचा चेहरा अंतिम करताना मुश्रीफांनी सध्या 'गोडसाखर'च्या निमित्ताने जे त्यांच्या विरोधात आहे, त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे पूर्वीचे कार्यकर्ते अप्पी पाटील व संग्रामसिंह कुपेकर हे वेगवेगळ्या गटांत गेल्याने त्यांच्याऐवजी ही उमेदवारी पाटील यांच्या गळ्यात पडली, तर हे दोघेही प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात आले.
गोकुळच्या निवडणुकीत उमेदवारीवरून आ. मुश्रीफ व आ. पाटील यांच्यात पहिली ठिणगी पडली. गोकुळच्या निकालानंतर एकमेकांचे उमेदवार पाडल्याचा आरोप होत ही दरी अधिकच रुंदावली. अशातच 'गोडसाखर'च्या राजकारणात आ. पाटील यांचे समर्थक मुश्रीफांच्या विरोधात गेले. त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याने 'गोडसाखर'च्या राजकारणातही थेट आ. मुश्रीफ विरुद्ध आ. राजेश पाटील अशीच लढत झाली. राष्ट्रवादीच्याच दोन आमदारांत ही लढत झाल्याने राज्यभर याची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या या फुटीचा फटका नेमका कुणाला बसणार, याबाबतचे तर्कवितर्क जोरात चर्चेत आले. आ. मुश्रीफ यांनी 'गोडसाखर'वर एकहाती सत्ता मिळवित आ. पाटील यांना अस्मान दाखविले असून, याचे परिणाम आ. पाटील यांच्या गटावर दिसून येणार आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार
आ. मुश्रीफ यांनी आ. पाटील यांचे प्रतिस्पर्धी संग्रामसिंह कुपेकर व अप्पी पाटील यांना सोबत घेत माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांनाही पुन्हा प्रवाहात आणत वेगळे नियोजन लावल्याने आगामी काळात मुश्रीफ यांच्याकडून आ. पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच प्रतिस्पर्धी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक गट आ. मुश्रीफांसोबत राहिल्याने आगामी काळात याचे परिणाम दिसून येणार आहेत.