Election Commissioner :  
Latest

राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत सर्वस्वी वेगळी

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशाचे सोळावे राष्ट्रपती निवडण्यासाठी येत्या 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. जनतेने जे आमदार व खासदार निवडून दिले असतात, ते या निवडणुकीत सहभागी होतात. आमदार व खासदारांचे मतदानाचे मूल्य वेगवेगळे असते.

संविधानातील कलम 54 नुसार, राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. या सदस्यांचे प्रतिनिधित्व प्रमाणबद्ध असते. म्हणजे त्यांचे पहिल्या मताचे लगेच रूपांतरण होते. पण त्यांच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते.

असे तयार होते इलेक्टोरल कॉलेज

लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य मिळून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. यात 776 खासदार (नामनियुक्‍त वगळून) व विधानसभेच्या 4120 आमदारांचा समावेश असतो. इलेक्टोरल कॉलेजचे एकूण मूल्य 10 लाख 98 हजार 803 आहे.

मतदानाची पद्धत

मतदानात सहभागी होणारे सदस्य प्रथम आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतात. ते मतपत्रिकेवर राष्ट्रपतिपदासाठी आपली पहिली, दुसरी व तिसरी पसंती नमूद करतात. पहिल्या पसंतीच्या मतांतून विजयी उमेदवार घोषित झाला नाही, तर त्याच्या खात्यात दुसर्‍या पसंतीची मते वळती केली जातात. त्यामुळे त्याला सिंगल ट्रान्सफरेबल मतदान असे म्हटले जाते.

आमदारांच्या मताचे मूल्य

आमदारांच्या मतांचे मूल्य राज्य व विधानसभा क्षेत्रातील लोकसंख्येवर अवलंबून असते. मताचे मूल्य ठरवण्यासाठी राज्याच्या लोकसंख्येला निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येशी भागले जाते. त्यानंतर येणार्‍या उत्तराला म्हणजे आकड्याला एक हजाराने भागले जाते. या प्रकारे त्या राज्याच्या आमदाराच्या एका मताचे मूल्य ठरवले जाते. यात भाग दिल्यानंतर आलेले उत्तर 500 हून अधिक असेल तर त्यात 1 जोडला जातो.

खासदारांच्या मताचे मूल्य

राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या मतांचे मूल्य प्रथम एकत्र केले जाते. आता हे मूल्य राज्यसभा व लोकसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येशी भागले जाते. त्यातून येणारी संख्या म्हणजे एका खासदाराच्या मताचे मूल्य असते. या प्रकारे भागाकार केल्याने 0.5 हून अधिक शिल्लक राहात असेल तर मूल्यात 1 जोडला जातो.

जय-पराजयचा फैसला

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत केवळ सर्वाधिक मते मिळाल्याने विजेता ठरत नाही. खासदार व आमदारांच्या मतांच्या एकूण मूल्याच्या अर्ध्याहून अधिक हिस्सा मिळवणारा उमेदवारच राष्ट्रपती होतो. उदाहरणार्थ, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य 10 लाख 98 हजार 882 आहे. तर उमेदवाराला 5 लाख 49 हजार 442 मते प्राप्त करावी लागतील. ज्याला सर्वप्रथम एवढी मते मिळतील, तो विजयी ठरतो.

असे आहेत मतदार

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा, राज्यसभा) सदस्य
राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली व केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीच्या विधानसभेचे सदस्य

यांना नाही मतदानाचा अधिकार

राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभांतील नामनियुक्‍त सदस्य
राज्यांच्या विधान परिषदेचे सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT