मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेससह इतर घटक पक्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला असला तरी खुद्द पवार यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवार यांनीच आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे राजकीय क्षेत्रात सुरू झालेल्या चर्चेचा धुरळा खाली बसला आहे.
त्याच वेळी पवार यांनी उमेदवारीला नकार दिल्यानंतर विरोधी पक्षांकडून गुलाम नबी आझाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. स्वतः पवार यांनीही आझाद यांचे नाव पुढे केले आहे.
दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. परंतु या भेटीचा संदर्भ देत काँग्रेस राष्ट्रपतिपदासाठी पवार यांच्या नावाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीही पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले होते.